अमरावती : धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी महासंघ आणि सांस्कृतिक महासंघ यांचा संयुक्त विद्यमाने विभागीय मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्यानिमित्त विभागातील महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर समाजाला विविध ज्वलंत प्रश्नांवर, महासंघाच्या कार्याबद्दल विचार मांडले.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर यांचा अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला उद्घाटक व मार्गदर्शक धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष चिमण डांगे, मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे, प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ, कर्मचारी महासंघ अध्यक्ष अंकुश निर्मळ, कृषिउत्पन्न बाजार समिती सभापती अशोक दहेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी आमदार वसंतराव लवणकर आणि गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी चिमण डांगे म्हणाले की, धनगर समाजाची हक्काची लढाई ही खूप जुनी आहे. महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे यांनी धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी महासंघाच्या रूपात एक आवाज उठविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सवलती लागू व्हाव्या, या मागणीसाठी महासंघाच्या नेतृवात लढा उभारणार असल्याची ग्वाही डांगे यांनी धनगर समाज बांधवांना दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रास्ताविक उमेश घुरडे यांनी तर संचालन लक्ष्मण उघडे यांनी केले.
मेळाव्याला रमेश ढवळे, ज्ञानेश्वर ढोमणे, बाळासाहेब अलोने, श्रीपाल पाल, दादासाहेब पुरडे, वसंतराव सावंत, अनिल कोल्हे, रमेश मातकर, रंगराव बिचुकले, छबु मातकर, वासुदेव पाठक, काशीनाथ फुटाणे, अशोकराव इसळ, साधना म्हस्के, मेघा बोबडे, शारदा ढवळे, दत्ता शिंदे, साहेबराव भदे, विनोद ढवळे, सचिन कोल्हे, मीना घुरडे, वैभव ढवळे, भानुदास काळे, अमर घटारे, अवकाश बोरसे, राजेंद्र आगरकर, कैलास निंघोट, स्वप्निल साव, दीपक चिंचे आदी उपस्थित होते.