बड़नेरा : आपसी वादातून गुरुवारी दुपारच्या सुमारास बड़नेऱ्यात पारधी बांधवांत हाणामारी झाली. गोटमारीत मनपा सहायक आयुक्तांच्या वाहनाला दगड लागला. पोलीस ठाण्यात विविध दोन घटनांच्या तक्रारी दाखल आहेत.
गुरुवारी पारधी बांधवांत रेल्वेस्थानक परिसरात वाद झाला. तेथून सर्व पारधी बांधव दुपारी महापालिका झोन कार्यालयाजवळ एकत्र आले. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद होऊन हाणामारी झाली. एकमेकांना गोटमार करीत असताना महापालिका कार्यालयाच्या हद्दीत उभे असलेल्या सहायक आयुक्तांच्या वाहनाला एक दगड लागल्याने काच फुटला. नुकसानीची तक्रार सहायक आयुक्तांनी बडनेरा पोलिसांत दाखल केली. अन्य तक्रारीत पारधी बांधवांत विविध ठिकाणी झालेल्या मारहाणीत दोघे पती-पत्नी जखमी झालेत. पती एरलाल बेरलाल भोसले, पत्नी संगीन भोसले हे जखमी झाले. इतरही काही लोक किरकोळ जखमी झाले. बडनेरा पोलिसांनी पारधी बांधवांच्या हाणामारीत फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. हाणामारीची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमी ऐरलालवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ पोहोचून घटनेवर नियंत्रण मिळविले. अधिक तपास उपनिरीक्षक उमेश मारोडकर करीत आहेत.