श्रीनिधीच्या वडिलांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, खाजगी कोचिंग क्लासने चिखलदरा सांगून चिचाटीत नेले
चिखलदरा (अमरावती) : चिखलदऱ्याला नेणार असल्याचे सांगून चिचाटी धबधब्यावर गेलेल्या सहलीत माझ्या तरुण मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू हा संशयास्पद आहे. प्रकरणाचा तपास करून यासाठी जबाबदार सहल आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत युवकाचे वडील प्रवीण सकळकळे (रा. वृंदावन वसाहत, अमरावती) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे शुक्रवारी एका तक्रारीतून केली.
श्रीनिधी प्रवीण सकळकळे (१७) या विद्यार्थ्याचा १३ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास चिचाटी धबधब्यावर पाण्यात बुडून मृत्यू झाला. चार दिवस उलटून गेल्यावरही सहल काढणारे कोचिंग क्लासचे आयोजक या विषयात उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. अन्य विद्यार्थ्यांवरदेखील सहल आयोजक दबाव टाकत आहेत. श्रीनिधीच्या मृत्यूचा कोचिंग क्लासचे प्रमुख व त्यांचे सर्व सहकारी कारणीभूत असल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
बॉक्स
चिखलदरा सांगितले, चिचाटीला नेले
चिखलदऱ्याचे नाव सांगून दुर्गम चिचाटी जंगलात सहल नेली. पालकांना कुठलाच तपशील दिला नाही. श्रीनिधीच्या संशयास्पद मृत्यूनंतर सर्व प्रकारच्या हालचाली काही तरी लपवले जात असल्याकडे निर्देश करतात, असा आरोप होत आहे. श्रीनिधीच्या मृत्यूमुळे सकळकळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण वृंदावन वसाहतमध्ये शोककळा पसरली आहे.
बॉक्स
१०७ विद्यार्थ्यांना नेले सहलीला
कोरोनाकाळात गर्दी जमवण्यास परवानगी नसताना न्यू प्रभात कॉलनीतील क्लासच्या संचालकाने १०७ विद्यार्थ्यांची सहल काढली. त्यांच्यासोबत केवळ चार शिक्षक होते. पालकांना या घटनेसंदर्भात कुठल्याच प्रकारची माहिती दिली नाही. धांदात वारंवार खोटे सांगण्यात आले. पालकांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. विद्यार्थ्यांना या घटनेसंदर्भात कुठलीच वाचता न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. एकंदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कोचिंग क्लासच्या संचालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे.