अतिरिक्त आयुक्तांचीही चौकशी : रामपुरी कॅम्पमधील अस्वच्छतेचे प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘इसराजी’ नामक साफसफाई कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीतून बाहेर काढण्याचा अतिरिक्त आयुक्तांचा आदेश अनधिकृत ठरला आहे. स्वच्छता विभाग यापूर्वीच काढून घेतल्याने शेटे यांनी काढलेल्या त्या आदेशाला महापालिका यंत्रणेत कुठलाच अर्थ नाही. दरम्यान ‘इसराजी’च्या एकूणच संपूर्ण प्रकरणाबाबत आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना विचारणा केली आहे. शेटे यांनी अधिकाराचा गैरवापर करून काढलेला आदेश, त्याअनुषंगाने ‘लोकमत’ने प्रकाशित केलेले वृत्त आयुक्तांनी गंभीरतेने घेतले असून याबाबत शेटे यांना चौकशी अहवाल मागितला आहे. दरम्यान इसराजी प्रकरणाची फाईल आयुक्तांनी मुख्य लेखा परीक्षक प्रिया तेलकुंटे यांच्याकडे पाठविली असून त्यांच्या परीक्षणानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होणार आहे.रामपुरी कॅम्प भागातील अस्वच्छतेला जबाबदार ठरवून प्रशासनाने २५ मार्च रोजी ‘इसराजी’ नामक स्वच्छता कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीत टाकले होते. त्या अनुषंगाने आपल्या संस्थेला काळ्या यादीबाहेर काढण्यात यावे, यासाठी इसराजीकडून विनंती करण्यात आली. अतिरिक्त आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यात आला. त्याअनुषंगाने गुरूवार ८ मे रोजी अतिरिक्त आयुक्त शेटे यांनी स्वअधिकारात आदेश पारित करून ‘इसराजी’ला काळ्या यादीतून बाहेर काढले. या प्रकाराबाबत अतिरिक्त आयुक्तांकडून प्रचंड गोपनीयता बाळगल्या गेली. तथापि, हा संपूर्ण नियमबाह्य प्रकार आयुक्तांच्या लक्षात आला. ‘लोकमत’ने यासंदर्भात ‘इसराजी संस्थेचा स्वप्नभंग’ असे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी सोमवारी याबाबत अतिरिक्त आयुक्तांना विचारणा करून दोन दिवसांत चौकशी अहवाल देण्याचे फर्मान सोडले आणि स्वच्छता विभाग नसताना शेटे यांनी काढलेले आदेश रद्दबातल होण्याच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले.या प्रकरणाची संपूर्ण फाईल आयुक्तांनी स्वत:च्या कस्टडीत ठेवली आहे. आयुक्तांच्या या पावित्र्यामुळे इसराजी संस्थेचे काळ्या यादीबाहेर पडण्याचे स्वप्न तूर्तास भंगले आहे. अतिरिक्त आयुक्तांना या प्रकरणात भल्यामोठ्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय राजकीय दबावतंत्राने काहीही साध्य नसल्याचेही संबंधितांच्या लक्षात आले आहे. इसराजीला काळ्या यादीबाहेर काढण्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी आदेश काढलेत. याबाबत त्यांच्याकडे विचारणा करून चौकशी अहवाल मागितला आहे. अहवालाअंती कारवाईची दिशा ठरेल.- हेमंत पवार,आयुक्त, महापालिका
‘इसराजी’ची फाईल आॅडिटरकडे
By admin | Published: June 18, 2017 12:07 AM