- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : वाघाच्या शिकारीसह वन्यजीवांच्या हत्त्येसंदर्भात पूर्व मेळघाट वनविभाग आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आपआपल्या दफ्तरी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यात वाघ, बिबट, बायसनसह (रानगवा) अन्य वन्यजीवांच्या शिकारीची कबुली आरोपींनी दिली आहे.‘गिरगुटी’ हे गाव पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत येत असून, या विभागाने एका आरोपीला अटक केली. त्याची वनकोठडीही मिळविली. आज या आरोपीला अचलपूर न्यायालयापुढे हजर केले असता, तेथून त्याची रवानगी सेंट्रल जेल अमरावती येथे करण्यात आली.पूर्वमेळघाट वनविभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, सहायक वनसंरक्षक अशोक प-हाड, वनपाल बारब्दे, हाते यांच्यासह वनाधिकारी व कर्मचा-यांनी मागील आठ दिवस सतत चौकशी चालविली. ही चौकशी गोपनीय ठेवण्यात आली. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे त्यावर कुणीही बोलायला तयार नाही. या चौकशीत दक्षता विभागाचे उपवनसंरक्षकांनीही आपला सहभाग दिला असून, हे सर्व अधिकारी घटनेचा उलगडा करण्यात मग्न आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात आलेल्या आरोपींना स्वत:च्या कस्टडीत घेऊन नव्याने पूर्वमेळघाट वनविभाग आपल्या स्तरावर स्वतंत्र चौकशी करणार असल्याचे सांगितल्या जात आहे.दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पानेही वाघासह अन्य वन्यजीवांच्या शिकारीच्या अनुषंगाने स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. व्याघ्र प्रकल्प अधिका-यांनीही त्या आरोपींची वनकोठडी घेऊन चौकशी सुरू ठेवली आहे. या आरोपींची वनकोठडीही शनिवार-रविवारच्या दरम्यान संपणार होती. या अनुषंगाने अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मागील १५ दिवसांपासून व्याघ्र प्रकल्प या चौकशीत गुंतलेला आहे. पण, चौकशीच्या अनुषंगाने कुठलीही माहिती देण्यास ते तयार नाहीत. चौकशी अधिका-यांच्या या गोपनीयतेमुळे मेळघाटातील वाघ आणि वन्यजीव मोठ्या प्रमाणात मारल्या गेल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान ‘लोकमत’ला प्राप्त माहितीनुसार या शिकारीच्या अनुषंगाने राष्टÑीय, आंतरराष्टÑीय तस्करी संदर्भातही चौकशी केल्या जात आहे. काही मोबाईल नंबरही चौकशी अधिका-यांच्या हाती लागले आहेत. पूर्वमेळघाट वनविभाग व व्याघ्र प्रकल्प या अधिका-यांनी या शिकार प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यातील आरोपींची कस्टडी न्यायालयाने वाढविली की, त्यांची जेलमध्ये रवानगी केली याविषयी मात्र माहिती मिळालेली नाही.