तिवसा (अमरावती) : अभिनय क्षेत्रात असल्यामुळे भारत भ्रमणासह विदेशातील विविध स्थळांना भेटी देण्याचा योग येतो. परंतु खऱ्या मनःशांतीसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमाला पर्याय असूच शकत नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मानवतावादी विश्वव्यापी कार्य व सर्वधर्मसमभावाची शिकवण जगाला दिशा देणारी असल्याचे मनोगत सिनेअभिनेत्री मंदिरा बेदी यांनी व्यक्त केले. त्या तळेगाव शामजीपंत येथील राजस्थान रॉयल्स अकॅडमी येथे आल्या असता त्यांनी गुरुवारी दुपारी गुरुकुंजाच्या आकर्षणापोटी गुरुकुंज आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
मंदिरा यांनी महासमाधीवर नतमस्तक होऊन प्रार्थना मंदिरात दर्शन घेतले. तसेच प्रार्थना मंदिरात लावण्यात आलेल्या थोर समाजसुधारकांच्या, आदर्श संतांच्या फोटोवरून त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे आश्रमातील पवित्र अस्थिकुंड, महाराजांचे ध्यानयोग मंदिर बघून त्या चांगल्याच प्रभावित झाल्या. तसेच त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयाची माहिती घेतली. यावेळी त्यांना आश्रमाच्या वतीने ग्रामगीता भेट देण्यात आली.
झगमगाटाच्या दुनियेत मनःशांती शोधावी लागते.
भौतिक सुखाचा झगमगाट असलेल्या जगात तुम्हाला पैसा, प्रसिद्धी, समृद्धी तर मिळते. परंतु आत्मिक समाधानासाठी कृत्रिम मार्ग शोधावे लागतात. परंतु गुरुकुंज आश्रमात एवढ्या व्यापक परिसरात असलेली नीरव शांतता, अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून आधुनिक भारताच्याच नव्हे विश्वकल्याणासाठी करण्यात येणारी प्रार्थना खरोखरच अभिमानास्पद आहे.
- मंदिरा बेदी, सिनेअभिनेत्री