लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहिणीच्या घरी पाहुणपणाला आलेल्या तरुणीचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना येथील बालाजी प्लॉट परिसरात घडली. सोमवारी रात्री १२.४० च्या सुमारास घडलेल्या या घटनेदरम्यान हवेत एक फायरदेखील करण्यात आला.नागपूरहून आलेल्या चौघांपैकी दोघांनी त्या तरुणीला दुचाकीवर बसवून पळ काढला, तर अन्य दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी नागपूरच्या चार तरुणांविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३६३, ५०६, ३४ व आर्म ॲक्ट ३/२५ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रेम प्रकरणातून हा थरार घडला. दरम्यान अपहृत तरुणीला मंगळवारी दुपारी राजापेठ पोलिसांनी आरोपी शानू ठाकूर याच्या नागपूर स्थित घरातून ताब्यात घेतले.व्यवसायाने चालक असलेला एक तरुण त्याच्या कुटुंबीयांसह बालाजी प्लॉट परिसरातील सीताराम बाबा मंदिराजवळ राहतो. त्याच्याकडे ५ मार्च रोजी त्याची चुलत साळी ऐश्वर्या (नाव बदललेले) व तिचा भाऊ असे दोघे पाहुणपणाला आले. ७ मार्च रोजी रात्री सर्व कुटुंब जेवणानंतर झोपी गेले. दरम्यान रात्री १२.३० च्या सुमारास ऐश्वर्याचे जावई लघुशंकेकरिता घराबाहेर आले असता, त्यांना दुचाकीवर आलेले दोन तरुण दिसले. त्या तरुणांनी एक आडनाव घेऊन ते कुठे राहतात, अशी विचारणा केली. त्याचवेळी जावयाने आपण ज्यांचे घर विचारताय, तो आपणच असल्याचे सांगितले. त्यावर एकाने नागपूरहून आलेली ती तरुणी कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यादरम्यान, ऐश्वर्यादेखील घराबाहेर आली. तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून नेत असताना तिच्या जावयाने त्यांना अडविले. त्यावेळी आरोपी गबरू उर्फ अस्मित खोटे याने त्यांच्या दिशेने बंदूक रोखत हवेत गोळी झाडली. बंदूक नाचवत गबरूने ऐश्वर्याला दुचाकीवर बसवून अंबादेवी मार्गाने पळ काढला. शानू ठाकूर (नागपूर) हा तेव्हा दुचाकी चालवत होता. त्याचवेळी दूरवर उभे असलेले प्रमेश आप्पाराव अधपाका (२५) व प्रफुल्ल छोटू दमाहे (२०, दोघेही रा. शेंडेनगर, नागपूर) यांनी दुचाकीने (क्र. एमएच ४९ बीटी १६८३) बालाजी प्लॉटमधून पळ काढला. यातील गबरू व शानू ठाकूर हे दोघेही नागपूरच्या दुर्गावती चौक येथील रहिवासी आहेत. येथे ज्याच्याकडे ऐश्वर्या पाहुणपणाला आली, त्याची पत्नी नागपूरची असल्याने तिने गबरू व शानूला ओळखले.
स्लिप झाले, न सापडलेराजापेठ पोलिसांनी तक्रारकर्त्या जावयाला सोबत घेऊन एमएच ४९ बीटी १६८३ या दुचाकीचा पाठलाग केला. सोमवारी रात्री नांदगाव पेठ टोलनाक्याच्या आधी ती दुचाकी स्लिप झाली. त्यावरील प्रमेश अधपाका व प्रफुल दमाहे हे दोघेही कोसळले व पोलिसांच्या हाती लागले. त्यांना तातडीने अटक करण्यात आली. तर त्या तरुणीसह गबरू खोटे व शानू ठाकूरचा शोध घेण्यासाठी राजापेठ पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झाले आहे. दरम्यान राजापेठ पोलिसांनी घटनास्थळाहून रिकामे काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी ८ मार्च रोजी पहाटे ६.२४ वाजता चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गबरू मुख्य आरोपी, नागपुरातही केला होता राडातक्रारीनुसार, ऐश्वर्या व गबरूचे प्रेमसंबंध आहेत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याचे नागपूर येथे साक्षगंध होत असताना गबरूने २०/२५ जणांसह तेथे गोंधळ घातला होता. त्यामुळे ऐश्वर्याचे लग्न मोडले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला अमरावतीला बहिणीकडे पाठविले. येथेही सोयरिक दाखविली जात होती. त्याबाबत माहिती मिळताच गबरू अन्य तिघांसह अमरावतीत पोहोचला. त्याने हवेत गोळी चालवून बंदुकीच्या धाकावर ऐश्वर्याचे अपहरण केले.