अमरावती : कोरोना काळात काही तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आलेली अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस (१२१५९/ ६०) ही रेल्वेगाडी पुन्हा धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली असून, तसे पत्र खासदार नवनीत राणा यांना प्राप्त झाले आहे. हा निर्णय म्हणजे जिल्हावासीयांना दसऱ्यानिमित्य अनोखी भेट मानली जात आहे. खासदार नवनीत राणा यांच्या मागणीनुसार केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांनी जबलपूर एक्सप्रेसला नागपूर येथून अमरावतीपर्यंत पुढे नेण्याची मान्यता दिली आहे.
ही रेल्वेगाडी नागपूर ते जबलपूर या दरम्यान सुरू होती. मात्र, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात ही रेल्वेगाडी अमरावती-जबलपूर अशी मंजूर झाली होती. ती अशीच बरेच वर्ष अमरावती- जबलपूर या दरम्यान सुरू राहिली. मात्र, कोरोना काळात अमरावतीपर्यंत धावण्यास ब्रेक लावला गेला. परंतु, या रेल्वेगाडीची मोठी डिमांड असल्याने पुन्हा सुरू करण्याची मागणी झाली. त्याकरिता खासदार राणांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाशी संपर्क ठेवला आणि पुन्हा अमरावती -जबलपूर एक्सप्रेस पूर्ववत धावणार असल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मानला जात आहे. ही रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी नुकतेच कॉंग्रेसने अमरावती रेल्वे स्थानकावर आंदोलन सुद्धा केले होते.
अमरावती- जबलपूर एक्स्प्रेस पुन्हा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक व सर्वसामान्यांना दळवळणाची चांगली सोय उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या प्रवाससुविधेत भर पडणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मागणी मान्य करून जिल्हावासीयांना न्याय दिला आहे, अशा भावना खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केल्या.