अखेर डॉ. सुनील देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 05:00 AM2021-06-20T05:00:00+5:302021-06-20T05:00:38+5:30
महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे केंद्रीय महासचिव अविनाश पांडे, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेस नेत्याच्या उपस्थितीत डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सात वर्षांनंतर शनिवारी भाजपला रामराम केला. मुंबई येथील टिळक भवनात आयोजित शानदार सोहळ्यात पुन्हा ते काँग्रेसवासी झालेत. त्यांच्या घरवापसीमुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले आहे.
महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे केंद्रीय महासचिव अविनाश पांडे, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेस नेत्याच्या उपस्थितीत डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाना पटोले यांच्या हस्ते देशमुख यांना पुष्पगुच्छ, दुपट्टा परिधान करून काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित केला.
सन २०१४ मध्ये डॉ. देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर ते आमदारदेखील झाले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गत काही दिवसांपासून त्यांची भाजपमध्ये घुसमट सुरू होती. स्थानिक भाजप नेत्यांशी त्यांचे फारशे जुळत नव्हते. प्रत्येक राजकीय घडामोडीसाठी डॉ. देशमुख यांना नागपूर येथे विचारावे लागत होते. भाजप सोडण्याचे हेदेखील महत्त्वाचे कारण मानले जात आहे.