अनिल कडू
परतवाडा : चिखलदरा पर्यटन खुले झाल्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अखेर मंगळवारी तेथील गार्डनचे गेट उघडले. पर्यटकांकरिता ते खुले करण्यात आले आहे.
चिखलदरा पर्यटनस्थळी वेगळे अस्तित्व टिकवून ठेवत पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करणारे हे शासकीय गार्डन चिखलदरा नगर परिषदेच्या हद्दीत व त्यांच्याच जागेत इंग्रज राजवटीपासून आहे. १९३६ मध्ये मेळघाटचे डीएफओ म्हणून कार्यरत तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात त्याचे काही बांधकाम केले गेले. याची आठवण करून देणारा दगड आजही बघायला मिळतो. स्वातंत्र्यानंतर पुढे प्रादेशिक वनविभाग त्याची देखभाल करीत आहे.
दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे युनिफाईड कंट्रोल अस्तित्वात आले. यातच चिखलदरा गार्डन मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागाकडे आले. येथे प्रवेशाकरिता पर्यटकाला २० रुपये मोजावे लागतात. यातील दहा रुपये मेळघाट टायगर फाउंडेशन, अमरावतीकडे, तर १० रुपये गुगामल वन्यजीव विभागाकडे वळते केले जातात. हे दहा रुपये गार्डनच्या देखभावलीवर खर्च केले जातात.
व्याघ्र अभयारण्यात समावेश नसलेल्या या गार्डनमध्ये काही वन्यप्राण्यांचे निर्जीव पुतळे लोखंडी पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहेत. त्यांना कोरोना होण्याचीही शक्यता नाही. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या ३० एप्रिल आणि ७ जून २०२१ च्या पत्राद्वारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने गार्डनमधील पर्यटन बंद ठेवले होते. ते उशिरा का होईना, आता २२ जूनला खुले केले गेले.