अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला स्वायत्तता दर्जा (ऑटोनॉमस) बहाल करण्यात आला आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे १७ फेब्रुवारी रोजी व्हीएमव्हीला पत्र प्राप्त झाले असून, संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गौरवात भर पडली आहे. विदर्भात सर्वात जुनी शासकीय शैक्षणिक संस्था म्हणून व्हीएमव्हीची नोंद आहे.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाची सहा सदस्यीय चमुने १५ व १६ जानेवारी रोजी असे व्हीएमव्हीचे ‘ऑटोनॉमस’साठी परीक्षण केले होते. गुजरात येथील सरदार पटेल विद्यापीठ वल्लभ विद्यानगरचे कुलगुरू शिरीश कुलकर्णी हे समितीचे अध्यक्ष होते. सदस्य दिल्ली विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख पारेख सिंह, जयपूर येथील प्राचार्य के.बी. शर्मा, विद्यापीठ नामीत सदस्य प्राचार्य के. के. देबनाथ, राज्य शासनाचे प्रतिनिधी उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, समन्वयक अधिकारी म्हणून अनुराग हे होते.
ऑगस्ट १९२३ मध्ये स्थापन झालेले किंग एडवर्ड कॉलेज, त्यानंतर विदर्भ महाविद्यालय आणि २००८ पासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था असे नामकरण झाले आहे. ब्रिटीशकालीन वारसा लाभलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला आता स्वायत्तता दर्जा बहाल झाल्याने अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही बाब गौरवास्पद ठरली आहे. १५० प्राध्यापक, पाच हजार विद्यार्थी आणि २३ पदव्युत्तर विभागात संशोधन केंद्र असलेले हे राज्यातील एकमात्र शैक्षणिक संस्था आहे.
-----------------------------------
कोट
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेने अमरावती विद्यापीठमार्फत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ३० नोव्हेंबर २०१९ रोजी संस्थेला स्वायत्तता दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्याअनुषंगाने १५ व १६ जानेवारी २०२० रोजी यूजीसीची चमुने संस्थेचे परीक्षण केले. आता १७ फेब्रुवारी रोजी यूजीसीच्या पत्रानुसार ‘ऑटोनॉमस’ दर्जा बहाल करण्यात आला आहे.
- वसंत हेलावी रेड्डी, संचालक, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती.