दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर गुगामल वन्यजीव विभागाचा तत्कालीन निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बलप्रमुख जी. साईप्रकाश यांनी ३१ मार्च रोजी एका समितीचे गठण केले होते. एकूण १६ मुद्द्यांवर ही समिती तपास करणार आहेत. त्यातील पहिल्याच क्रमांकाचा मुद्दा वादग्रस्त ठरल्याने तो बाद करण्यात आला. त्यानंतर आता १५ मुद्दे घेऊन ही समिती रविवारपासून तीन भागांत अधिकाऱ्यांची टीम तयार करून क्षेत्रीय कर्मचारी-अधिकारी, कार्यालय कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्यात येत आहे. त्यामध्ये समितीला अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रधान मुख्य वनसंरक्षक माहिती-तंत्रज्ञान व धोरण (नागपूर) एम.के. राव हे समितीचे अध्यक्ष असून, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्तांसह अध्यक्ष मुख्य महाव्यवस्थापक वन विकास महामंडळ (नागपूर) मीरा त्रिवेदी, मेळघाट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, अमरावती वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, सेवानिवृत्त विभागीय वनअधिकारी किशोर मिश्रीकोटकर व वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे असे या समिती सदस्य आहेत. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक प्रवीण चव्हाण हे सदस्य सचिव आहेत.
बॉक्स
पहिलाच वादग्रस्त मुद्दा वगळला
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला असताना, या समितीने कशाप्रकारे चौकशी करावी, यासाठी १६ प्रश्नांची मालिका देण्यात आली होती. त्यामध्ये पहिला प्रश्न ‘दीपाली चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पूर्वीचे सेवा कालावधीत ज्या-ज्या ठिकाणी काम केले आहे, त्या ठिकाणी तसेच हरिसाल येथे कार्यरत असताना त्यांचे अधिनस्थ व वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्यासोबत कशा प्रकारे वागणूक केली’ हा मुद्दाच चौकशी कुणाची करणार, यावर वादग्रस्त ठरल्याने वगळण्यात आला आहे
बॉक्स
बारा दिवसांनंतर आगमन, नंतर पंधरा मुद्द्यांवर चौकशी
३१ मार्च रोजी समितीचे गठण झाल्यानंतर तब्बल बारा दिवसांनंतर समिती अखेर मेळघाटात दाखल झाली. एकूण १५ मुद्द्यांवर आता अधीनस्थ क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे बयान समिती नोंदवित आहे. त्यामध्ये दैनंदिनी तपासून अनुमान काढणे, विनोद शिवकुमार याने दीपाली चव्हाण यांना किती प्रकरणात कारणे दाखवा सूचना, ज्ञापनपत्र देऊन त्यांचा खुलासा विचारला, पुनर्वसित गावात कितीदा विनोद शिवकुमार याने भेटी दिल्या, मांगिया येथील ॲट्रॉसिटी प्रकरणात नेमके काय घडले, पोलीस अधिकाऱ्यांशी कुठले संभाषण विनोद शिवकुमार याने केले, कुठली नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडले याची तपासणी, क्षेत्रसंचालक दौऱ्यावर असताना गरोदरपणात पायी चालवल्यामुळे झालेला गर्भपात, चिठ्ठीत लिहिलेल्या कामाचा निधी किती प्रमाणात देण्यात आला, कितीदा दीपाली चव्हाण यांची रजा रद्द करण्यात आली, वनमजूर, कर्मचारी, गावकऱ्यांसमोर विनोद शिवकुमार याने अपमानास्पद वागणूक दिली, अशा विविध पंधरा प्रश्नांवर ही समिती चौकशी करीत आहे.
-------------
अनेक किस्से केले समितीपुढे कथन
विनोद शिवकुमार क्षेत्रीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना रात्री-अपरात्री शासकीय गणवेशात बोलवायचा व तेथून बेपत्ता व्हायचा. अशाप्रकारे अनेकदा कर्मचाऱ्यांना त्याने मानसिक त्रास दिला. त्याचे मद्यपान, मटण पार्ट्या, अपमानास्पद वागणूक आदी किस्स्यांचा पाढा कर्मचाऱ्यांनी समितीपुढे लेखी स्वरूपात मांडल्याची माहिती आहे. क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी-अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचेसुद्धा बयान सोमवारी सकाळी नोंदवून समितीचे सदस्य हरिसाल येथे सायंकाळपर्यंत चौकशी करीत होते.