अमरावती : गत तीन दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसाने अंजनगाव बारीनजीकचा भिवापूरकर तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, आमदार रवि राणा यांच्या पुढाकाराने शुक्रवारी जेसीबीने भिवापूरकर तलावाचा बांध मोकळा करून गावात शिरणारे पाणी वेगळ्या मार्गाने विळविण्यात आले.
गुरुवारी सततच्या पावसाने पुरातन भिवापूरकर तलाव पूर्णत: भरल्याने तो फुटू शकतो, या स्थितीचे गांभीर्य ओळखून गुरुवारी रात्रीलाच आमदार रवि राणा यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना याविषयी अवगत केले. त्यानंतर आमदार राणा यांनी उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, नायब तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार बढीये, वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर, जलसंपदा उपविभागीय अभियंता सावंत, जिल्हा परिषद पाटबंधारे अभियंता पातुरकर, डहाके, मंडळ अधिकारी उगले यांच्यासमवेत तलाव परिसराची पाहणी केली. दरम्यान अतिवृष्टीने तलाव भरल्याचे पाहून अऱ्हाड, कुऱ्हाड, उतखेड, पार्डी येथील ग्रामस्थांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला. शुक्रवारी दोन जेसीबीच्या सहाय्याने तलावाचा बांध मोकळा करून संभाव्य धोका टाळला गेला. तलाव परिसरातील मार्ग अतिवृष्टीने चिखलमय झाला असल्याने आमदार रवि राणा यांनी ट्रॅक्टरने घटनास्थळ गाठले, हे विशेष.
--------------------