महापालिका प्रशासन बॅकफुटवर, स्थायी समितीने फेटाळला होता ७० लाखांच्या संचखरेदीचा वाढीव प्रस्ताव
अमरावती : महानगरातील खुल्या जागा, उद्यानात बसविण्यासाठी २३ ‘ग्रीन जीम’ संच खरेदीसाठी नव्याने ई-निविदा प्रक्रिया राबविणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शनिवारी स्थायी समितीने ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, हे आता स्पष्ट झाले आहे.
‘लोकमत’ने १९ जुलै रोजी ‘७० लाखांचे ‘ग्रीन जीम साहित्य ई-निविदेविना खरेदीचा डाव’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंधित पुरवठादाराला ग्रीन जीम संच पुरविण्याचे कार्यारंभ आदेश नसतानासुद्धा त्यांनी सोमवारी प्रवीणनगर येथे नगरसेवकांच्या मागणीनुसार हे संच प्रभागात बसविण्यासाठी आणले होते. तथापि, स्थायी समितीने ‘ग्रीन जीम’ संच खरेदीसाठी नव्याने ई-निविदा राबवावी, हे स्पष्ट केले असताना अधिकारी परस्पर पुरवठादारासोबत कशी ‘फिक्सिंग’ करतात, हे आता समाेर आले आहे. ना निविदा, ना आदेश तरीही प्रवीणनगर येथे ग्रीन जीम संच पोहोचले कसे, यात बरेच काही दडले आहे. ग्रीन जीमचे २३ संच खरेदीसाठी ७० लाख ३२ हजार ९४० रुपयांच्या वाढीव कामांना स्थायी समितीने फेटाळले, हे विशेष.
------------------
कोट
स्थायी समितीच्या निर्णयानुसार नगरसेवकांच्या वाढीव मागणीच्या अनुषंगाने २३ ग्रीन जीम संच
खरेदीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. स्थायीचा निर्णय हा अंतिम निर्णय असून, त्याचे तंतोतंत पालन केले जाईल.
- रवींद्र पवार, शहर अभियंता, बांधकाम
-------------------
प्रवीणनगर येथे सोमवारी ग्रीन जीम साहित्य बसविण्यासाठी आणले आहे. त्याकरिता नारळदेखील फोडले. नागरिकांची याप्रसंगी उपस्थिती होती. मात्र, ते साहित्य तूर्त बसविले नसून, तसेच ठेवण्यात आले आहे. पुढे काय झाले, हे कळलेच नाही.
- माधुरी ठाकरे, नगरसेविका, प्रभाग क्रमांक ५