अमरावती : येथील एनसीसी कॅन्टीन पुलगाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने तात्काळ रद्द केला आहे. यासंदर्भातील माहिती नवी दिल्ली येथील कँन्टीन सर्व्हिस विभागाचे डिप्टी डि.टी.ई ब्रिगेडियर बत्रा यांनी बुधवारी बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुद्देशीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यामुळे अमरावती विभागातील सुमारे १० हजार माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता-पिता, माजी सैनिक विधवा व पाल्य सदस्यांना मोठा दिलासा मानला जात आहे.
अमरावती विभागासाठी गत ६९ वर्षांपासून एनसीसी कॅन्टीन आहे. मात्र ही कॅन्टीन पुलगाव येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय संरक्षण विभागाचा हा निर्णय एकूणच सैनिकी कुटुंबियांसाठी अन्यायकारक होता. परिणामी हा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुद्देशीय संघटन अमरावतीचे अध्यक्ष बी. एस. राय, नंदकिशोर काळे, गजानन इंगळे, धीरज सातपुते, गजानन शेरेकर, अशोक बुंदे, सुभेदार गोविंद चव्हाण, सुभेदार पंजाबराव राणे, रमेश रामटेके, प्रेमदास इंगळे, विठ्ठल वानखडे, नरेंद्र वानखडे, धर्माजी बोरकर, गजानन मेश्राम, दिलीप खंडारे आदींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्या पुढ्यात मांडली.
गडकरींनी सूत्रे हलविली आणि अमरावतीची एनसीसी कॅन्टीन पुलगाव येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय रद्द झाल्याची माहिती दिल्ली येथील ब्रिगेडियर बत्रा यांनी दिली. त्यामुळे आता या कॅन्टीनमधून नियमितपणे वस्तू, साहित्याचा लाभ अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील सैनिकांसह कुटुंबीयांना घेता येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एनसीसी कॅन्टीन स्थलांतरित करू नये, यासाठी निवेदनाद्वारे पुरावा केला. याचेच फलित म्हणजे दिल्ली येथील ब्रिगेडियर बत्रा यांनी ही कॅन्टीन स्थलांतरित होणार नाही, ही माहिती भ्रमणध्वनीद्वारे बुधवारी दिली.
- बी. एस. राय, अध्यक्ष, बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुद्देशीय संघटन