अमरावती : राज्याच्या कारागृह विभागात सुमारे दोन हजार नवीन पदांना गतवर्षी मंजुरी मिळाली होती. मात्र आता नवीन वर्षात पदभरतीचा मुहूर्त निघाला असून, १ जानेवारीला २५५ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न तसेच तांत्रिक संवर्गातील पदांचा समावेश असल्याने बेरोजगार युवकांना दिलासा मानला जात आहे.
कारागृह विभागात प्रशासकीय आणि तांत्रिक सेवेमधील पदांसाठी hhtp://www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. १ ते २१ जानेवारी २०२४ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर परीक्षांची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्र, अटी, शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण, वयोमर्यादा, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना आदी माहितीसंकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.या पदांसाठी होणार भरती
लिपिक - १२५, वरिष्ठ लिपिक - ३१, लघुलेखक निम्न श्रेणी - ४, मिश्रक- २७, शिक्षक -१२, शिवणकाम निदेशक -१०, सुतारकाम निदेशक- १०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- ८, बेकरी निदेशक - ४, ताणाकार- ६, विणकाम निदेशक- २, चर्मकला निदेशक- २ तसेच निटींग अँन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, लोहारकाम निदेशक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपपि निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षक असे प्रत्येकी एक असे एकूण २५५ पदे भरती केली जाणार आहे.