अमरावती : राज्याच्या कारागृह विभागाने अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग -१ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश १४ जून रोजी जारी केले आहेत. तथापि, पदोन्नती न देता बदली केल्यामुळे अधिकाऱ्यांचे भविष्यात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. काही अधिकारी मुंबई, ठाणे येथील खुर्ची काबीज करण्याचे मनुसबे बाळगून होते, पण अपर पोलिस महासंचालकांच्या खेळीने या अधिकाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याचे बोलले जात आहे. तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या आहेत.
पुणे येथील अपर पोलिस महानिरीक्षक सुनील ढमाळ यांची येरवडा मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव हे मुंबई मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांंची ठाणे मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अरुण मुगुटराव यांंची नाशिक रोड येथे, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांची कोल्हापूर, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांची चंद्रपूर जिल्हा कारागृह, तर चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी अशा एकूण सात प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कारागृह उपअधीक्षक संवर्गात मुंबई येथील दिलीपसिंग डाबेराव यांची ठाणे, तर ठाणे येथील भाईदास ढोले यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात बदली झाली आहे. जिल्हा कारागृह वर्ग २ संवर्गात मंगेश जगताप (खुला) यांची अहमदनगर जिल्हा कारागृह, विकास रजनलवार (भ.ज.ब) यांची मुंबई महिला कारागृह, तर रवींद्र गायकवाड (खुला) यांची येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बदली झाली आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृह अतिरिक्त अधीक्षक नितीन वायचळ यांची सेवा तत्काळ प्रभावाने रत्नागिरी विशेष कारागृहात प्रत्यार्पित करण्यात आली आहे.
स्वीय सहायक, प्रशासन अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी संवर्गातील पुणे येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे विनोद गडेवाड यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच जालना जिल्हा कारागृहाचे संतोष जढर यांची औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, तर दत्तप्रभू आंधळे यांची जालना जिल्हा कारागृहात बदली झाली आहे.