अमरावती : गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मात्र, यंदाही मंडप डेकोरेशन, लाइटिंग, सजावट करणाऱ्या कारागीर, व्यावसायिकांना कोरोनामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. काेरोनामुळे बहुतांश गणेशोत्सव मंडळांचा साधारण उत्सवावर भर दिसत आहे.
प्रशासनाने यावर्षीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिल्याने मंडप डेकोरेशनच्या व्यावसायिकांना पुन्हा आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. मंडपाच्या आकारावर त्यांचे दर ठरत असतात. मात्र, प्रशासनाने गणेशमूर्तीची उंची आणि आरतीबाबत मर्यादा आणल्या आहेत. परिणामी मंडळाकडून छोट्या मंडळांना पसंती दिली आहे. अनेकांनी जास्त तामझाम न करता अतिशय साधेपणाने मंडळात ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यावर्षी मंडप डेकोरेशन करणाऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात व मर्यादा येताना दिसत आहे.
कोट
गणेशोत्सवासाठी कर्ज घेऊन विविध प्रकारचे लाइटिंग व सजावटीचे साहित्य आणले. मात्र, २०१९ मध्ये कोरोनाच्या संकटामुळे आमचे जगणे मुश्कील केले आहे. यंदाही मंडप आणि लाइटिंग यांना अपेक्षित मागणी नाही. परिणामी यावर्षी आम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
- पवन भिसे, मंडप डेकोरेटर व्यावसायिक