अमरावती : इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची आधीच्या इयत्तेची उजळणी घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सेतु अभ्यासक्रमाचा आर्थिक भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे. या अभ्यासक्रमासाठी पीडीएफ फाईल तयार करण्यात आले असून, त्यांच्या प्रिंट आऊट काढण्यासाठी पालकांना विषयानुसार पैसे खर्च करावे लागत आहेत. झेरॉक्स सेंटरवर जाऊन व्हाॅट्सॲपवर पाठविलेल्या तसेच ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या पीडीएफ फाईलच्या प्रिंट काढण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या गतवर्षीच्या इयत्तामधील पाठ्यक्रमाची उजळणी व्हावी, यासाठी ४५ दिवसांचा सेतु अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात येत आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळांनी अनेक विद्यार्थ्यांची जुन्या इयत्तेची पुस्तके जमा केली आहेत. असे असताना अभ्यासक्रमाच्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची उजळणी होण्यासाठी हीच पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती ताजी असतानाच अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या इयत्ता दुसरी ते नववी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे पीडीएफ पुस्तकस्वरूपात काढून अभ्यासाचे काम भागवावे लागत आहे. त्यामुळे विनामूल्य उजळणीसाठी तयार करण्यात आलेल्या सेतु अभ्यासक्रमाच्या उद्देशालाच तडा गेल्याचे चित्र आहे.
कोट
यापूर्वी शासनाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांकडून पाठपुस्तके जमा करणे सुरू आहे. त्याचा दररोज आढावा घेतला जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पुस्तके जमा झाली. त्यामुळे शाळास्तरावर गोंधळ होत आहे. यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक समिती