सिटिंग पॅनेलमध्येही बदल होण्याचे संकेत, ‘विड्रॉल’नंतर अनेकांचे प्रवर्ग बदलणार
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. हल्ली ‘उमेदवार मतदारांच्या दारी’ असा प्रचाराला वेग आला आहे. मात्र, सेवा सहकारी सोसायटीमधून काही उमेदवार विजयासाठी सुरक्षित जागेचा शोध घेत असल्याने सिटिंग पॅनेलमधूनही जागांमध्ये बदल होण्याचे संकेत आहे.
रविवारी काही उमेदवारांनी अमरावती शहरातील मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या असता असे चित्र दिसून आले.
जिल्हा बॅंक निवडणुकीत नामांकन दाखल आणि छाननी पूर्ण होताच उमेदवार आता मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. २१ संचालकांच्या निवडीसाठी १६८६ मतदार मतदान करतील. २२ सप्टेंबरपर्यंत नामांकन मागे घेण्याचा अवधी असल्याने कोण मैदानातून बाहेर पडते, याकडे लक्ष लागले आहे. २३ सप्टेंबरनंतरच अधिकृत पॅनेल घोषित होईल, असे चित्र आहे. तूर्त सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनेल अशा लढतीचे चित्र आहे. मात्र, दोन्ही पॅनेलमध्ये उमेदवारांना स्थान मिळाले नाही, तर ते तिसऱ्या पॅनेलची निर्मिती करतील, अशा वाटचाली सुरू झाल्या आहेत. यंदा बॅंकेची निवडणूक राजकीयदृष्ट्या चांगलीच तापणार आहे. महाविकास आघाडीसह भाजपचे नेते सहकार क्षेत्रातील दिग्गज राजकीय विचार बाजूला ठेवून जिल्हा बॅंकेत गळाभेट घेत आहेत. एक-एक मत आपल्या बाजूने कसे येतील, याचे नियोजन करीत आहेत.
-------------------
दर्यापुरात दोन भावांमध्ये चुरस?
दर्यापूर तालुका सेवा सहकारी सोसायटी संचालक पदासाठीच्या निवडणुकीत आमदार प्रकाश भारसाकळे
विरुद्ध विद्यमान बॅंकेचे संचालक सुधाकर भारसाकळे यांच्यात चुरस होणार आहे. दोन भाऊ एकाच प्रवर्गातून आमने-सामने उभे ठाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दर्यापूर तालुक्यात सेवा सहकारी सोसायटीसाठी ७५ मतदार संख्या आहे. भारसाकळे बंधूंमध्ये घमासान होणार असल्याने काहीजण दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीमधून संचालक पदासाठी दाखल केलेले नामांकन आपसुकच मागे घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सिटिंग पॅनेलमध्येही वेळेवर प्रवर्गातून उमेदवार बदलेल, असे दिसून येते.