फोटो पी १७ दयार्पूर
दर्यापूर : राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहता, राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यावरही अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील काही दुकानदार आपली दुकाने लपूनछपून चालवत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाच्यावतीने शहरातील करिअर कम्प्यूटर अॅकेडमी व बॉम्बे फॅशनवर कारवाई करीत प्रत्येकी दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
अकारण फिरणाऱ्या ६१ व्यक्तींची बसस्थानक चौकात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी तीन व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या. उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी शिबिरात सात व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. त्यांना तात्काळ कोविड रुग्णालयात पाठवण्यात आले. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी कमी होत नसल्याने अशा व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी दिली. तालुक्यात शुक्रवारी ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला.
नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर निघावे, अकारण बाहेर पडू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार योगेश देशमुख, मुख्याधिकारी गीता वंजारी, ठाणेदार प्रमेश आत्राम, कर्मचारी व डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे. दंडाची कारवाई करीत असताना हा अधिकारी वर्ग उपस्थित होता.