फोटो - पी/२७/अनिल कडू फोल्डर
फोटो - ते पत्र, मान्यवरांच्या हाती वस्त्रोद्योग मंत्र्यांचे पत्र
परतवाडा : अचलपूरची फिनले मिल सुरू करण्यात येत असल्याबाबतचे वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचे पत्र भाजप नेत्यांनी कामगारांच्या व्यासपीठावरच व्हायरल केले.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावे २४ डिसेंबरला पत्र पाठविले. हे पत्र घेऊन भाजप नेते कामगारांचे उपोषण सोडविण्याकरिता २६ डिसेंबरला परतवाड्यात पोहोचले होते. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळद्वारे संचालित ही फिनले मिल जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येत आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केली जाणार आहे. कोविड १९ च्या अनुषंगाने आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश मिल व्यवस्थापनास देण्यात आल्याचे वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी त्या पत्रात नमूद केले आहे.
कामगारांचे दीर्घकाळ चाललेले उपोषण सोडविताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, निवेदिता चौधरी, गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष अभय माथने यांनी व्यासपीठावरूनच ते पत्र उपस्थित कामगारांना दाखवले. कामगारांपर्यंत ते पोहचवले. या दरम्यान कामगारांकडून खासदार नवनीत राणा यांचे आभार मानण्यात आले.
खासदार नवनीत राणांसह भाजपाच्या नेत्यांनी या पत्राच्या व मिल सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रबंधकांसह व्यवस्थापनाशी संवादही साधला. या सकारात्मक चर्चेनंतर मिल प्रबंधकांनी २६ डिसेंबरपासूनच कामगारांना कामावर येण्यास सुचविले.
नऊ महिन्यांपासून मिल बंद
लॉकडाऊनच्या अनुषंगाने नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या या फिनलेमधील यंत्रसामग्रीचे पहिल्या टप्प्यात मेंटेनन्स करण्यात येणार आहे. याकरिता ५२० कामगारांची मदत घेतली जाणार असून, मेंटेनन्सनंतर पूर्ण क्षमतेने मिलमधील उत्पादन सुरू केले जाणार आहे. फिनले मिलमध्ये ८०० कामगार कार्यरत असून, यातील ३०० कामगार कायमस्वरूपी आहेत. मिल सुरू झाल्यामुळे या सर्वांच्या रोजीरोटीचा, पूर्ण वेतनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.