नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) - अचलपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या कांडली परिसरातील दत्तनगर येथे असलेल्या एका गॅस एजन्सीच्या गोदामाजवळ पोलिसांनी जप्त करून दिलेले दुसऱ्या झोपडीतील सिलिंडरला रविवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान आग लागली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोठ्या आवाजाने नागरिक घराबाहेर जीव वाचवत सैरावैरा पळत सुटले. या घटनेत कोणालाच दुखापत झाली नसल्याचे माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दल सुरक्षा पथक तैनात असल्याचे अचलपूरचे उपविभागी य अधिकारी संदीप कुमार अपार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
परतवाडा शहराला लागून कांडली ग्रामपंचायत आहे. रस्त्यालगत श्रीराम गॅस एजन्सीचे गॅस गोदाम आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा ठेवण्यात आला आहे. परंतु त्या गोदामाजवळ 500 मीटर दूर अंतरावर पोलिसांनी जप्त केलेले सिलिंडर एका झोपडीत सात ते आठच्या संख्येत ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी अचानक आग लागल्याने ठेवण्यात आलेल्या सिलिंडरचा स्फोट होऊ लागला मध्यवस्तीत असल्याने घाबरून नागरिक पळू लागले.
संतप्त नागरिकांनी गोदाम फोडले
भर वस्तीत हे सिलिंडरचे गोदाम असल्याने नागरिकांनी अनेकदा त्याला विरोध केला परंतु हटविण्यात आले नाही. अखेर ही घटना घडल्याने संतप्त नागरिकांनी गोदाम फोडल्याची माहिती आहे.
आग नियंत्रणात, प्रशासन घटनास्थळी
आगीची घटना घडताच परतवाड्याच्या ठाणेदार संतोष ताले अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दल तहसीलदार मदन जाधव, महसूल व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्यात आली असून आगीच्या कारणाचा शोध सुरू आहे
मोठा अनर्थ टळला
गोदामात मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा ठेवण्यात आला आहे. ही आग पोलिसांनी जप्त करून परत केलेल्या सिलिंडरच्या वेगळ्या साठ्याला लागल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
घटनास्थळी सर्व यंत्रणा तैनात आहे अग्निशमन दलसुद्धा आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- संदीप कुमार, अपार उपविभागीय अधिकारी अचलपूर