प्रदीप भाकरे
अमरावती : राजापेठस्थित हॉटेल इम्पेरियाला लागलेल्या आगीदरम्यान नागपूर येथील व्यापारी दिलीप ठक्कर यांचा गुदमरून मृत्यू झाला. अन् महापालिकेचे पितळ उघडे पडले. त्या हॉटेलमध्ये पुरेसी अग्निरोधक संसाधन नव्हती. अन् हॉटेलचे फायर ऑडिटदेखील झालेले नव्हते, ही बाब उघड झाली. महापालिकेच्या ‘ध्रूतराष्ट्रीय’ अग्निशमन विभागाने डोळे उघडले. अन् १५ दिवसांत ‘फायर ऑडिट’ करवून घेण्याचे फर्मान महापालिकेने काढले. ते पंधरवड्याचे ‘अल्टिमेटम’ १६ सप्टेंबर रोजी संपुष्टात आले. मात्र, दिलेल्या मुदतीत एकाही आस्थापनाधारकाने ‘फायर ऑडिट’ करवून घेतले नाही.
अर्थात फायर ऑडिट १५ दिवसांच्या आत करवून घ्या, असा अल्टिमेटम देणाऱ्या महापालिकेला ‘त्या’ आस्थापनाधारकांनी ‘ठेंगा’ दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. या कालावधीत चौधरी चौकस्थित एका हॉटेल कम लॉजव्यतिरिक्त कुणीही फायर ऑडिटसंदर्भात अग्निशमन विभागकडे साधी विचारणादेखील केली नाही. त्यामुळे या विभागाने पंधरवड्यापूर्वी ‘त्या’ डझनभर आस्थापनाधारकांना खरेच नोटीस पाठविल्या, की निव्वळ बनवाबनवी केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
३१ ऑगस्ट रोजी रात्री २ ते ३ च्या दरम्यान हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागली होती. त्यामुळे तेथील विद्युत पुरवठा खंडित होऊन काळोख पसरला. असलेल्या अपुऱ्या अग्निरोधक संसाधनालादेखील तेथील कर्मचाऱ्यांना हाताळता आले नाही. तेथे इमर्जंसी एक्झिटदेखील नव्हती. त्यामुळे तेथे थांबलेल्या नागपूरच्या दिलीप ठक्कर (५४) यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. तशी तक्रारदेखील राजापेठ पोलिसांत नोंदविण्यात आली. हॉटेल संचालकाविरूद्ध १ सप्टेंबर रोजी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
/////////////
उपायुक्तांना दिला होता अल्टिमेटम
महापालिकेचे उपायुक्त सुरेश पाटील यांनी अग्निशमन यंत्रणेसह २ सप्टेंबर रोजी हॉटेल इम्पेरियासह अन्य हाॅटेल लाॅजची पाहणी केली. त्यावेळी त्यांना एका मॉल व्यतिरिक्त अन्य कुठल्याही आस्थापनाधारकाने फायर ऑडिट करवून न घेतल्याचे निरीक्षण नोंदविले. आयुक्तांच्या आदेशाने त्यांनी त्या हॉटेल लॉज संचालकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला. तशा नोटीस त्यांना बजावल्याची माहिती उपायुक्त व महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, १६ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत नोटीस दिलेल्यांपैकी एकानेही महापालिकेकडे ‘फायर ऑडिट’ अहवाल दाखल केला नाही. किंवा साधी विचारणादेखील केली नाही.
////////////////////
कोट
संबंधित आस्थापनाधारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. १५ दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र, गुरूवारपर्यंत विभागाकडे त्यांच्याकडून कुठलाही फॉर्म आलेला नाही.
- अजय पंधरे,
अधीक्षक, अग्निशमन विभाग
////////
पोलिसांचीही नजर
याबाबत ८ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी पोलीस आयुक्तालयात फायर ऑडिटसंदर्भात एमआयडीसी असोशिएशन, हॉटेल लॉज संचालकांची बैठक घेतली होती. ज्या आस्थापनांना ते बंधनकारक आहे, त्यांनी आठवड्याभरात ते करवून घ्यावे, अशी ताकीद त्यात देण्यात आली होती. ती मुदत संपुष्टात आल्याने शुक्रवारपासून पोलिसांकडून पडताळणी केली जाणार आहे.