बडनेऱ्यात दोन घटना : शेतकऱ्यांचे नुकसानबडनेरा : महामार्गावरील आरको गॅरेजसमोरील एका शेतातील संत्रा व मोसंबीची शेकडो झाडे आगीत जळून खाक झाल्याची घटना बुधवार २२ मार्च रोजी घडली. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. एकाच दिवशी बडनेऱ्यात दोन विविध ठिकाणी आगीच्या धटना घडल्या. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला महामार्गावरील एका गॅरेजसमोर अतुल देशमुख (रा. अमरावती) यांचे शेत आहे. या ५ एकर शेतात संत्रा व मोसंबीच्या कलमा लावल्या होत्या. ज्या भागात झाडे आहेत, त्यावरून इलेक्ट्रिक वायरींग गेली आहे. शॉर्टसर्किटमुळे या झाडांना आग लागल्याचे सांगितले जात आहे. शेकडो झाडे आगीत जळून खाक झाल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमकचे दोन बंब आले होते. तसेच नव्या वस्तीतील बसस्थानकाच्या मागील बाजूस खुल्या जागेत वाळलेल्या गवताला आग लागली. यावर वेळीच नियंत्रण आणल्या गेले. यात कुठलेही नुकसान झालेले नाही. एकाच दिवशी बडनेऱ्यात आगीच्या दोन घटना घडल्या. एक दिवस आधी मालगाडीतील कोळशाला आग लागली होती. बडनेऱ्यात मनपा झोन कार्यालयातील अग्निशमन बंब वेळेत पोहोचत असल्याने आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले जात आहे. (शहर प्रतिनिधी) विद्युत उपकेंद्राच्या आवारात आग अकोला महामार्गावरील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या आवारात आग लागल्याची घटना गुरुवार २३ रोजी उघडकीस आली. एक्सप्रेस हायवे लगतच्या धुऱ्यापासून आग सुरू झाली. वाळलेल्या गवताला आग असल्यामुळे हवेमुळे ही आग विद्युत उपकेंद्राच्या आवारात पोहोचली. अग्निशमन बलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान उपकेंद्रातला वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
आगीमुळे शेकडो संत्रा झाडे भस्मसात
By admin | Published: March 24, 2017 12:14 AM