लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: चांदूर बाजारातील ब्राह्मणवाडा थडी मार्गावरील तीन संत्रा मंड्यांना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता शॉर्ट सर्किटने आग लागली. या भीषण आगीत ८० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.संत्र्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून चांदूर बाजाराची ओळख आहे. शहरातील ब्राह्मणवाडा थडी मार्गावर हंगामात दरवर्षी सात ते आठ संत्रा मंड्या उभारण्यात येतात. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ब्राह्मणवाडा थडी मार्गावरील अब्दुल सलीम शेख फरीद यांची एक, तर अतीक अहमद सईद अहमद यांच्या दोन संत्रा मड्यांना आग लागली. यामध्ये अ. सलिम शेख फरीद यांच्या मंडीतील ३० लाखांचे १५ हजार प्लास्टिक कॅरेट, तीन लाखांचे टीनशेड व २० हजारांच्या वजन काट्याचे आगीत नुकसान झाले.अतीक अहमद यांच्या दोन मंड्यांमध्ये संत्रा बहर संपुष्टात आल्याने मोठ्या प्रमाणात टरबुजाचा साठा करण्यात आला होता. आगीत २२ लाखांचे ११ हजार प्लास्टिक कॅरेट, १२ लाखांची वॅक्सिंग मशीन, आठ लाखांचे टीनशेड तसेच दीड लाखांचे टरबूज जाळून आगीत पूर्णत: खाक झाले. ही आग शॉर्ट सर्कीटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग विझवण्याकरिता चांदूर बाजार येथील अग्निशमन दल, एच.जी. इन्फ्रा कंत्राटदार कंपनीचे दोन टँकरसह अचलपूर येथील अग्निशमन वाहनाने दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.संत्रा मंडीला आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेला दिल्यानंतरही चांदूरबाजार नगरपालिकेचे अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी अर्धा तास उशिरा पोहोचली. त्यातच ही अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली तेव्हा अर्धी रिकामीच होती.नगरपालिकेचे दुर्लक्षस्थानिक अग्निशामन दलाचे वाहन लीक असल्याने यामध्ये पाणी साठवून ठेवणे अशक्य असल्याची खंत वाहनचालक एजाज अली यांनी सांगितले. वाहन दुरुस्तीबाबत पालिका प्रशासनाला अनेकदा लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तरीही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यावेळी घटनास्थळी तहसीलदार उमेश खोडके, तलाठी भारत पर्वतकर, मंडळ अधिकारी गजेंद्र मानकरसह शिरजगाव बंड ग्रामपंचायतचे सरपंच मानपुरे उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारात आग; ८० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 8:35 PM
चांदूर बाजारातील ब्राह्मणवाडा थडी मार्गावरील तीन संत्रा मंड्यांना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता शॉर्ट सर्किटने आग लागली. या भीषण आगीत ८० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्दे तीन संत्रा मंडी जाळून खाक