अचलपूर पं.स. इमारतीला दुसऱ्यांदा आग : उच्चस्तरीय चौकशीची मागणीअचलपूर : तीन दिवसांपूर्वी अचलपूर पंचायत समिती परिसरातील आरोग्य विभागाच्या गोदामाला आग लागली होती. त्यात लाभार्थ्यांना देण्याचे साहित्य जळून खाक झाले. या वर्षातील पंचायत समिती परिसरातील गोदामाला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. १८ जानेवारीला याच प्रशासकीय इमारतीच्या मागच्या बाजूला गोदामाला आग लागून सर्व शिक्षा अभियानाचे संच व भंगार जळून खाक झाले होते. या आगीपासून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कुठलाच धडा न घेतल्याने ७ एप्रिल रोजी पुन्हा आग लागण्याची पुनरावृत्ती घडली.पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर असणाऱ्या आरोग्य विभागाचे कार्यालय व दोन गोदामांना ७ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागून आरोग्य विभागातील दस्ताऐवज, संगणक, लाकडी आलमारी, टेबल खुर्ची, औषधांचे रेफ्रीजरेटर व दोन गोदामातील २८ सायकली जनरेटर साऊंड सिस्टीम जळून खाक झाले. संबंधित अधिकारी आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असे सांगत असले तरी लागलेल्या या आगीबद्दल जनतेत संशय असून या दोन्ही आगींची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी केल्यास आगीचे खरे कारण जनतेला समजेल. शासकीय कार्यालयांना आगीच्या घटना थांबविण्यासाठी विशेष दिशानिर्देश दिले असतानाही अचलपूर पंचायत समितीत मात्र आगीपासून सुरक्षेच्या अनुषंगाने कुठलीच व्यवस्था नसल्याचे दिसून येते. नवीन इमारतीत एकही फायर बंब नसून घटनेच्या दिवशी पाण्याच्या टाक्या रिकाम्या होतात. पण पंचायत समिती परिसरात आधी आगीची घटना झाली असताना कुठलाही बोध संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन त्यावर काहीच उपाययोजना केली नाही. याबाबत गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)
आरोग्य विभागातील आग संशयाच्या भोवऱ्यात
By admin | Published: April 11, 2016 12:17 AM