महापौरांच्या हस्ते उद्घाटन : वाहन उपलब्धअमरावती : महानगरपालिकाद्वारे बडनेरा परिसरातील नागरिकांच्या संरक्षणाकरिता नवीवस्ती बडनेरा महापालिका झोन कार्यालय येथे अग्निशमन उपकेंद्र आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्या निर्देशान्वये सुरू करण्यात आले आहे. महापौर चरणजितकौर नंदा यांच्या हस्ते बडनेरा अग्निशमन उपकेंद्राचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. बडनेरा येथे अग्निशमन उपकेंद्र निर्माण करण्याचे विचाराधीन होते. या भागातील नगरसेवक यांची वेळोवेळी यासंदर्भातील सर्वसाधारण सभेमध्ये मागणी होती. आयुक्त पवार यांनी बडनेरा येथे उपकेंद्र सुरू करण्याचे निर्देश अग्निशमन विभागाला दिले. एक वाहन व त्याकरिता इतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बडनेरा शहरामध्ये अथवा आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये आगीची घटना किंवा आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन विभागामार्फत त्वरित नियंत्रण मिळविणे शक्य व्हावे, या उद्देशाने याठिकाणी हे अग्निशमन वाहन दिले गेले होते. परंतु मुख्य अग्निशमन केंद्रापासून बडनेरा शहर दहा किलोमीटर दूर असल्याने अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटे लागतात. त्यामुळे बडनेरा शहरात २४ तास अग्निशमन वाहन उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशाप्रमाणे दक्षिण झोन बडनेरा येथे अग्निशमन उपकेंद्र निर्माण करण्यात आले आहे. या केंद्रात एक अग्निशमन वाहन त्यावर नऊ फायरमॅन, तीन वाहन चालक देण्यात आले आहे. आपत्तीकालीन व नैसर्गिक आपत्तीचे वेळी ०७२१-२६८१२७३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.यावेळी महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, गटनेता प्रकाश बनसोड, गुंफा मेश्राम, झोन सभापती अंजली पांडे, नगरसेविका कांचन ग्रेसपुंजे, छाया अंबाडकर, जयश्री मोरे, नगरसेवक चंदुमल बिल्दानी, जावेद मेमन, विजय नागपुरे, उपआयुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता जीवन सदार, सहायक आयुक्त योगेश पीठे, अग्निशमन पथकप्रमुख नरेंद्र मिठे तसेच मोठ्या प्रमाणात बडनेरा येथील नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बडनेरा येथे अग्निशमन उपकेंद्र कार्यान्वित
By admin | Published: September 19, 2016 12:16 AM