अमरावती : मेळघाटाच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला दररोज मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. तीन दिवसांपासून घटांग, भुलोरीसह मध्य प्रदेशाच्या कुकरू परिसरातील जंगलात आगडोंब उसळला आहे. वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी रात्रंदिवस आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित तसेच वनविभागाच्या संरक्षित जंगलात आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सेमाडोह मार्ग, भुलोरी, घटांग व जारिदासह मध्य प्रदेशच्या कुकरू खोऱ्यात ही आग मागील तीन दिवसांपासून धुमसत आहे. वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी-कर्मचारी, वनमजूर अंगारी जंगलात असून बुधवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात आग नियंत्रणात आल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली.
रस्त्यावर आग, फोटो, व्हिडिओ व्हायरल
परतवाडा, घटांग, सेमाडोह, धारणी, इंदूर या मार्गावर रात्रीला जाणाऱ्या प्रवासी वाहनांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात ही आग दोन दिवसांपासून दिसत आहे. या आगीची छायाचित्रे देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत.
जंगलाची राख, वन्यप्राणी सैरावैरा
जंगलात लागलेली आग पाहता सरपटणाऱ्या प्राण्यांचा भाजल्याने मृत्यू होत आहे, तर इतर वन्यप्राणी जंगलातून सैरावैरा दुसरीकडे जात असल्याचे चित्र आहे. रस्त्यावरच रात्रीला अस्वल किंवा अन्य प्राण्यांचे दर्शन नागरिकांना होत आहेत. आग लावण्यासोबत विडी, सिगारेट पिणारे रस्त्याने जाताना तसेच फेकून देत असल्याने आग लागत असल्याचे पुढे आले आहे.