दीडशे झाडे बेचिराख; लाखोंचे नुकसान; भरपाईची मागणी
चांदूर बाजार : तालुक्यातील पिंपरी थूगाव येथील शेतकऱ्याचा शेतातून गेलेल्या वीजवाहिनीत शॉर्ट सर्कीटने शेतातील सुमारे दीडशे झाडे बेचिराख झाली. आंबिया बहरात आलेली संत्री व स्प्रिंकलर सेट जळल्याने शेतकऱ्याचे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
पिंपरी थुगाव येथील विजय निकम यांचे पिंपरी-मासोद रस्त्यावर वडिलोपार्जित ११ एकर सामाईक शेती आहे. यामध्ये १३५० संत्राझाडांची बाग आहे. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीचे घर्षण होऊन अचानक आगीचे लोळ जमिनीवर कोसळले. यात शेतातील काही झाडांनी पेट घेतला. बघता बघता शेतातील आगीने रौद्र रूप धारण केले. काही कळण्याचा आत शेतातील १४ वर्षे जोपसना केलेली १५० ते १६० संत्राझाडे आगीत नष्ट झाली तसेच आठ दिवसांआधी दीड एकरात टाकलेले नवीन ड्रीप व स्प्रिंकलर सेटसुद्धा जळून खाक झाले.
लोंबणाऱ्या विद्युत वहिनीविषयी परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा महावितरणला तोंडी तसेच पत्रव्यवहार करून सूचना दिल्या होत्या. त्यावर कार्यवाही करण्यात न आल्याने नुकसानभरपाईची मागणी विजय निकम यांनी केली. आगीची माहिती तहसील कार्यालय व महावितरण विभागाला देण्यात आली आहे. वृत्त लिहिस्तोवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नव्हती, हे विशेष.