अमरावती : महापालिका अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाला असतानाही त्याला कर्तव्यावरून कमी करण्यात आले. एवढेच नव्हे तर एजन्सीने तीन महिन्यांचे वेतनही दिले नाही. त्यामुळे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, पीडित कामगाराने आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे पत्र यंत्रणेला दिले आहे. प्रणय प्रकाश बागडे (वाहनचालक, महापालिका अग्निशमन) असे कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्रणय बागडे यांनी २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर, उपायुक्त, स्थायी समिती सभापती आदींना पत्र पाठवून कैफियत मांडली. २ ते १६ मार्च २०२१ या कालावधीत कोविड -१९ ने आजारी असताना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती होता. त्यामुळे अग्निशमन विभागात कर्तव्यावर रूजू होऊ शकलाे नाही. याबाबतची माहिती वाहनचालक कंत्राटदार एजन्सीचे संचालक रवि सपकाळ, अग्निशमन विभागप्रमुख संतोष केंद्रे यांना देण्यात आली होती. असे असतानासुद्धा प्रणय बागडे याला कर्तव्यावर रूजू करून न घेता दुसऱ्या वाहनचालकांना नियुक्त करण्यात आले. महापालिकेत कंत्राटी एजन्सीच्या
अफलातून कारभार आणि वेतनाअभावी ३ ऑगस्ट २०२१ राेजी एका अस्थायी कर्मचाऱ्याने जीवनयात्रा
संपविली. हीच परिस्थिती माझ्यावरही आली असून, आत्महत्या करू द्या अथवा न्यायालयात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे प्रणय बागडे यांनी केली आहे.