लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. त्याअनुषंगाने तीन दिवसांत तेथील कचरा विलगीकरण प्रक्रिया करावी, अन्यथा उसळणाऱ्या जनआंदोलनाला महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा सुकळी व लगतच्या ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.निविदानानुसार, सुकळी कंपोस्ट डेपोची कचरा साठवणुकीची मर्यादा केव्हाच संपुष्टात आली असताना तेथे रोज ३०० टन कचरा विनाप्रक्रिया टाकला जात आहे. त्यात घरगुती कचऱ्यासह प्लास्टिक, ओला व सुका कचरा, जैववैद्यकीय कचरा, ब्लेड, सॅनिटरी नॅपकिन, डायपरचा समावेश आहे. तेथे कचऱ्याचा डोंगर साचला असून त्याला वारंवार आग लागत आहे. आग आणि धुरातून निघणाऱ्या विषारी वायुमुळे सुकळीसोबतच अमरावती शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे. हवा प्रदूषित झाली असून, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबाबत १७ आॅक्टोबरला पर्यावरणस्रेही नंदकिशोर गांधी यांनी महापालिकेस निवेदनही दिले. सोबतच सुकळी कंपोस्ट डेपोलगत ज्यांची शेती आहे, त्या शेतकऱ्यांनीही निवेदन दिले. मात्र महापालिकेकडून अद्यापही सुकळी कंपोस्ट डेपो, तेथील आग व अन्य प्रश्न सोडविता आले नाहीत. २५ आॅक्टोबर रोजी पुन्हा आयुक्तांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालकमंत्री तथा महापौरांना निवेदन दिल्याची माहिती मो. अकील यांनी दिली. तीन दिवसांत सुकळी कंपोस्ट डेपोतील कचरा विलगीकरण व प्रक्रिया करावी, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा मो. शकील, राममिलन वर्मा, सादिक शहा, मो. अफसर, वि.दा.पवार आदींनी आयुक्तांना निवेदानातून दिला आहे. प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम २०००, २००६ व २०१६ ची पायमल्ली चालविली आहे.
सुकळी कंपोस्टची आग ग्रामस्थांच्या जिव्हारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 9:46 PM
सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे.
ठळक मुद्देजनआंदोलनाचा इशारा : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केव्हा?