नरेंद्र जावरे
अमरावती : नागपूर नंतर जिल्ह्यात ‘एच३ एन२’चा पहिला रुग्ण आढळला असून गुरुवारी रात्री त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शहराला लागून असलेल्या अकोली परिसरातील रुग्ण असल्याची माहिती आहे. जिल्हा रुग्णालयात विशेष दक्षते खाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ताप खोकला आजाराने ग्रस्त असल्याने त्याने तपासण्या केल्या. त्याच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. पहिला रुग्ण सापडताच आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. कर्मचारी संपावर असताना हा‘एच३ एन२’ या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.लक्षण साधे, रुग्ण कंट्रोलमध्ये
सर्दी-खोकला, ताप, अशक्तपणा येणे, ओकारी होणे, हगवण लागणे, तापाचा प्रकार अशी लक्षणे या रुग्णात आढळून येतात. हा संसर्गजन्य आजार असल्याचे व भारतीय असलेला रुग्ण आटोक्यात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.कोरोनाप्रमाणेच काळजी , आयसोलेशनमध्ये रुग्ण
रोग प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे व कोरोनाप्रमाणेच प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले असून घाबरून जाण्यासारखे कारण नसल्याची स्पष्ट करण्यात आले आहे. ‘एच३ एन२’ आढळून आलेल्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला आहे.
सफाई कर्मचारी परतले
जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील सर्व विभागाचे कर्मचारी संपावर गेले आहे. आरोग्य विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात संपावर गेल्यामुळे त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे. परंतु जिल्हा रुग्णालयातील 62 शिपाई व सफाई कर्मचारी शुक्रवारी सकाळी कामावर परतले आहेत.
‘एच३ एन२’चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्याला इसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्याच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाही, मात्र काळजी घेणे गरजेचे आहे.
- दिलीप सौंदळे, जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती