अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अमरावती विभागातील पहिले केंद्रीय स्वयंपाकगृह अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीत सुरू झाले आहे.जुळ्या नगरीतील ५७ शाळांतील १४ हजार ३९४ विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृहात शिजवलेला आहार १ आॅगस्टपासून वितरीत केला जात आहे. यामुळे या शाळांमधून खिचडी शिजवणे बंद झाले. शिक्षकांना केवळ शिकवणे व मुख्याध्यापकांना शालेय प्रशासन सांभाळण्याचेच काम तेवढे करावयाचे आहे. विद्यार्थ्यांना गरम आहार वितरित करण्याकरिता गायत्री महिला बचत गटाकडे १८ शाळांमधील ४६२३, स्वस्तिक बेरोजगारांची स्वयंरोजगार नागरी सेवा संस्थेला २५ शाळांमधील ४९१३, तर निओ सर्व्हिसेसकडे १४ शाळांमधील ४८५८ विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संस्थांनी निर्धारित ठिकाणी जुळ्या नगरीत आपापले स्वतंत्र केंद्रीय स्वयंपाकगृह सुरू केले आहेत.इयत्ता पहिली ते पाचवीतील प्रतिविद्यार्थी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त ४०० ते ४५० ग्रॅम, तर सहावी ते आठवीकरिता प्रतिविद्यार्थी ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त ७०० ते ७५० ग्रॅम वजनाची खिचडी पुरवावी लागते. मुख्याध्यापकांनी कळविलेल्या वर्गनिहाय उपस्थितीनुसार, हवाबंद कॅन, डब्यातून, वाहनांमधून दिलेल्या वेळेत शिजवलेला गरम आहार ते शाळांपर्यंत पोहचवित आहेत. प्रत्येक डब्यावर, कॅनवर शाळेच्या नावाचे, वजनाचे स्टिकर लावले जाते. शाळेत वजन करून आहार दिला जातो.केंद्रीय स्वयंपाकगृह संचालकांनी स्वच्छतेवर जोर दिला आहे. आहार वाटपावर नगर परिषद प्रशासन अधिकारी संजय तळोकार, प्रताप गावंडे, सागर महल्ले, मो. शब्बीर, मो. फकीर लक्ष ठेवून आहेत.अचलपूरमध्ये सुरू झालेले केंद्रीय स्वयंपाकगृह अमरावती विभागातील पहिले आहे. दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, अमरावती महानगरपालिका क्षेत्रासह विभागात केंद्रीय स्वयंपाकगृह सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत ते कार्यान्वित होतील.- अमोल इखे, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार, अमरावती विभाग.
पहिले केंद्रीय स्वयंपाकघर अचलपूरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:37 AM
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अमरावती विभागातील पहिले केंद्रीय स्वयंपाकगृह अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीत सुरू झाले आहे. जुळ्या नगरीतील ५७ शाळांतील १४ हजार ३९४ विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृहात शिजवलेला आहार १ आॅगस्टपासून वितरीत केला जात आहे.
ठळक मुद्देशालेय पोषण आहार योजना। १४ हजार विद्यार्थ्यांना शिजवलेला आहार वितरित