मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या ४५८ जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ‘गॅस सिलिंडर’, ‘कपबशी’ चिन्ह मिळविलेल्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली. ‘रोड रोलर’ चिन्हाच्या उमेदवारांचा ‘ट्रॅक्टर’ने घात केला आहे. ‘शिवणयंत्र’ चिन्ह घेतलेल्या ५० पेक्षा अधिक महिला या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.
१ हजार ९७ उमेदवारांपैकी ४५८ उमेदवार विजयी झाले. यात १२० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. महत्त्वाचे म्हणजे, ‘गॅस सिलिंडर’असलेले सर्वाधिक ७० उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. ‘कपबशी’ दुसऱ्या क्रमांकावर असून, या चिन्हाचे उमेदवार ग्रामपंचायत सदस्य बनले आहेत. ‘छत्री’, ‘बॅट’, ‘कपाट’, ‘दूरदर्शन संच’, ‘छताचा पंखा’ या चिन्हांच्या उमेदवारांनी निवडणुकीत अधिक मजल मारली आहे. तालुक्यातील एका गटाच्या उमेदवाराने ‘रोड रोलर’ घेतले, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराने ‘ट्रॅक्टर’ चिन्ह घेतले होते. ‘रोड रोलर’ चिन्ह घेतलेले उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी झाले.
गड आला पण सिंह गेला
तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीचे नेतृत्व करणारे सरपंच, उपसरपंच तथा गावचे कारभारी या निवडणुकीत पराभूत झाले. पॅनलचे नेतृत्व करताना या उमेदवारांनी स्वत:च्या प्रभागाकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे. यात पाच वर्षात केलेल्या कामगिरीची काही मतदारांना एलर्जी झाली तर काही मतदारांनी गावात विकास केला नाही, म्हणून अशा दिग्गज उमेदवारांचा पराभव केला. २२ गावात गड आला पण सिंह गेला अशी अवस्था निर्माण झाली आहे.
शिलाई मशीनला अधिक पसंती
तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक सदस्य महिला झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यात सर्वाधिक विजयी चिन्ह ‘शिलाई मशीन’ होते. दुसऱ्या क्रमांकावर ‘छत्री’ चिन्ह घेऊन महिला उमेदवार विजयी झाल्याचे पाहायला मिळत आहे.