सुरेश सवळे - चांदूरबाजारअल्पसंख्यकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने चांदूरबाजारात सुरू केलेल्या उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांना तिलांजली देण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शाळा प्रवेशाचे स्वागत करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश असताना येथे मात्र शाळा परिसर साफ करण्यासाठी मुख्याध्यापकांसह सर्व विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेतल्याचे आढळले.ज्या ब्रिटिशांनी या शाळेचा शुभारंभ केला त्यांचा ध्वज आजही शाबूत असला तरी शाळा परिसरात मात्र घाणीचे साम्राज्य आहे. आजही चिमुकले विद्यार्थी आसनपट्टीवरच बसतात. नगर परिषद प्रशासनाचे मात्र या शाळेतील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील उर्दू भाषिकांची संख्या लक्षात घेता सन १८९२ मध्ये ब्रिटिशांनी येथे नगर परिषद उर्दू देशी पूर्व नावाने प्राथमिक शाळा सुरू केली. अवघ्या २९ विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या शाळेत आज ४१७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र आज त्यांना मिळणारी मूलभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासोबतच आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालिका प्रशासन नागरिकांकडून मालमत्ता करासोबत शिक्षण कराच्या स्वरूपात लाखो रूपये वसूल करते. याशिवाय शासनाकडूनही शाळेतील मूलभूत सुविधेसाठी निधी दिला जातो. मात्र पालिका प्रशासनाकडून याकडे होणारे दुर्लक्ष हा चर्चेचा विषय झाला आहे. आज या उर्दू शाळेला १२२ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी तेव्हाच्या परिस्थितीनुसार सुविधा होत्या. त्यावेळी विद्यार्थी आसनावर बसून शिक्षण घ्यायचे. आजही तिच परिस्थिती कायम आहे. पिण्याचे पाणी आहे; मात्र ते शुध्द असेल याची शाश्वती देता येत नाही. नळ आहे, पण त्याला तोट्या नाहीत. नळाजवळ घाण साचलेली आहे. ज्या इमारतीत हे चिमुकले शिक्षण घेतात त्याचे छत तुटलेले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वर्ग खोलीत शिरते. शाळा परिसरात असलेले प्रसाधनगृहसुध्दा अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेले आहे. या परिसरातून जाणारी नाली घाणीने बुजलेली असतानादेखील त्याची सफाई होत नाही. पोषण आहारसुध्दा विद्यार्थी उघड्यावरच खातात. यामुळे नगरपालिका प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात ‘झाडू’
By admin | Published: July 01, 2014 1:16 AM