अमरावती : शहरातील एका महिलेचा म्युकर मायकोसिस आजाराने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा हा पहिला मृत्यू असल्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुजोरा दिला आहे.
शहरातील साईनगर भागातील ६२ वर्षीय महिला संक्रमित असल्याने उपचारासाठी येथील महेश भवन स्थित कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल होती. बरे वाटल्याने दोन आठवड्यांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर या महिलेला पोस्ट कोविड म्युकर मायकोसीसचा त्रास व्हायला लागल्याने येथीलच एका खासगी रुग्णालयात ७ मे रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती सदर रुग्णालयाच्या समन्वयकांनी दिली. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा रुग्ण म्युकर मायकोसिस या पोस्ट कोविड आजाराने दगावल्याचे सांगितले. महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांच्याशी संपर्क साधला असता, ही रुग्ण महिला म्युकर मायकोसिस या आजाराने मृत्यू झाल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत म्युकर मायकोसिसच्या पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्यात व सध्या सहा रुग्ण दाखल असल्याचे ईएनटी तज्ज्ञ श्रीकांत महल्ले यांनी सांगितले. शहरात किमान ३५० रुग्ण म्युकर मायकोसीस या आजाराचे असल्याचे नेत्रतज्ज्ञ पंकज लांडे यांनी सांगितले.