संजय खासबागे ।आॅनलाईन लोकमतवरूड : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या लहानग्या इसंब्रीची कृपलाराणीची सध्या तालुक्यात सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ३४ व्या दीक्षांत समारंभात कृपलाराणीने एलएलएम अभ्यासक्रमात सुवर्ण पदक पटाकावून वरूड तालुक्याच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला आहे. कृपलाराणीचे पालक शेतमजुरी करतात, हे विशेष.इसंब्री येथील कृपलाराणी रामदास भिसेकर हिने विपरीत परिसिथितीतून व परिश्रमाने हे यश संपादन केले. शेतमजूर असलेल्या आईवडिलासोबतच कुटुंबाला आधार व्हावा, यासाठी मोलमजुरी करीत असतानाच माध्यमिक, उच्च माध्यमिकचे शिक्षण पूर्ण केले. जरुडच्या उत्क्रांती विधी महाविद्यालयातून एलएलबीची पदवी मिळविली. अभ्यासाप्रती असलेली आवड व विधी अभ्यासक्रमाची माहिती या बळावर ज्या महाविद्यालयात विधी अभ्यासक्रमाची पदवी घेतली त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करण्याची विचारणा झाल्यावर आपल्या मेहनतीची फलश्रृती झाल्याची अनुभूती तिला आली.कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असताना शिक्षणाची जिद्द असल्याने नोकरी करतानाच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागात प्रवेश घेतला. प्रचंड आत्मविश्वास आणि जिद्द चिकाटीने दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून तिने अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर विधी विभागात प्रथम येण्याचा मान मिळविला.कुलगुरुंच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानितनुकत्याच पार पडलेल्या ३४ व्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते सुवर्ण पदक देवून सन्मानित करण्यात आले. विधी शाखेमध्ये कृपलाराणी ही पहिलीच सुवर्णपदक विजेता आहे, तर अभ्यासक्रम सुरू असताना विद्यापीठातूनच पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ह्यूमन राईट्समध्येसुद्धा पदविका प्राप्त केली आहे. हिच्या यशाचे श्रेय आई, वडील, भाऊ तसेच उत्क्रांती विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देते.
शेतमजुराची मुलगी ठरली पहिली सुवर्ण पदक विजेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:05 PM
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या लहानग्या इसंब्रीची कृपलाराणीची सध्या तालुक्यात सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.
ठळक मुद्देएलएलएममध्ये प्रथम : कुटुबांची परिस्थिती जेमतेम, मजुरी करून मिळविले यश