आॅनलाईन लोकमतअमरावती : मंगळवार, २ जानेवारी रोजी या वर्षातील पहिल्या सुपरमूनचा योग आहे.चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो. त्यामुळे तो महिन्यातून एकदा पृथ्वीच्या जवळ येतो व एकदा दूरही जातो. मात्र, ज्यावेळी चंद्र पृथ्वीपासून वाजवीपेक्षा कमी अंतरावर येतो, त्यावेळी त्याचे बिंब नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठे दिसते. अशा चंद्राला ‘सुपरमून’ असे म्हणतात. साधारणत: १२ महिन्यांच्या कालचक्रात चार ते सहा सुपरमूनचे योग येतात. मागील वर्षी ३ डिसेंबरला हा योग आला होता, तर आता २ जानेवारी व ३१ जानेवारी रोजी पुन्हा सुपरमूनचे योग आहेत. या तिन्ही सुपरमूनमध्ये मंगळवारचा सुपरमून सर्वांत मोठा राहील. या दिवशी जागतिक वेळेनुसार पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी चंद्र पृथ्वीपासून किमान अंतरावर येईल. यावेळी हे अंतर ३,५६,५६५ कि.मी. राहील. या बिंदूवर चंद्र जवळजवळ २२ मिनिटे राहील व तो नेहमीच्या चंद्रापेक्षा ३० टक्के अधिक तेजस्वी व आकारमानात १४ टक्के मोठा दिसेल.चंद्र पृथ्वीपासून जवळ असताना आकार व दूर असताना आकार यात सूक्ष्म फरक असतो. त्यामुळे चंद्राच्या आकारात होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. मात्र, शास्त्रज्ञ विशेष फोटोग्राफीच्या माध्यमातून चंद्राच्या आकारातील बदल लक्षात घेऊ शकतात. तरीही आकाशात ढगांचा अडथळा नसल्यास जिज्ञासू व अभ्यासू व्यक्तींनी या दिवसाच्या चंद्राचे अवलोकन करावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे खगोलशास्त्र शाखा प्रमुख रवींद्र खराबे, प्रवीण गुल्हाने व रोहित कोठाडे यांनी केले आहे.
नवीन वर्षातील पहिला ‘महाचंद्र’ आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 10:55 PM