अमरावती : पहिलीच्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिले पाऊल हा खास कार्यक्रम होणार आहे. राज्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता वाढीसाठी निपुण महाराष्ट्र अभियान जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १ हजार ७३९ शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. सर्व शाळांमधील शाळापूर्व तयारी पहिला मेळावा २३ ते ३० एप्रिल या दरम्यान तसेच दुसरा मेळावा जुनच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाणार आहे.
या काळात शालेय, महिला बालविकास आणि सहभागी घटकांनी पहिले पाऊल शाळापूर्व तयारी मेळाव्याला भेट देऊन प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निपुण महाराष्ट्र निपुण भारत या अभियानांतर्गत ३ ते ९ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी यापूर्वीच कार्यक्रम राबविले जात आहेत. जे विद्यार्थी शाळांमध्ये पहिले पाऊल टाकतील, त्यांचीही शाळांमध्ये येण्यापूर्वी पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान यावे यासाठी पहिले पाऊल हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात २०२३-२४ साठी आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये दाखल पात्र मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी, या प्रत्येक दाखल पात्र मुलांना शाळापूर्व तयारीसाठी पहिले पाऊल प्रत्येक वाडी, वस्तीवर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचापहिले पाऊल हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील विविध घटकांच्या सहभागातून तसेच माता गटांच्या सहभागातून पहिला मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शाळा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन जूनच्या माता-पालकांना, मुख्याध्यापक व गामस्थांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी पहिला मेळावा एप्रिल अखेर व दुसरा मेळावा २१ जूनमध्ये आयोजित केला जाणार आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान १ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालक करून घेणार आहेत. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.