अमरावती : कोरोना काळात शाळा बंद असतानाही शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडून जुनी पाठ्यपुस्तके परत घेण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांकडून दररोज पालकांना सूचना करून पुस्तके परत मागितली जात आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी ‘विद्यार्थ्यांकडे असलेली जुनी पुस्तके शाळेत जमा न करता सेतू अभ्यासक्रमाकरिता वापरावीत, अशी घोषणा केली. त्यामुळे या सावळ्या गोंधळाने शिक्षकांचीही मोठी दमछाक होत असून सध्या शिक्षणाबाबत एक ना धड, भाराभर चिंध्या, अशीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ती आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी अभ्यासक्रम बदलत नसल्याने त्याच पुस्तकांचा पुनर्वापर करता येतो. म्हणून गेल्यावर्षी दिलेली पाठ्यपुस्तके यावर्षी परत घेऊन ती नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना दिली जातात. गेल्या वर्षीपासून शाळा बंद असल्या तरीही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना सूचना देऊन जुनी पाठ्यपुस्तके परत मागविली जात आहे. शिक्षण विभागाकडून आतापर्यंत या पाठ्यपुस्तकाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने निम्यापेक्षा अधिक पालकांनी शाळेत येऊन पुस्तके परत केली आहे. इतकेच नाही तर नवीन शैक्षणिक सत्राला ऑनलाईन सुरुवात झाल्याने काही शाळांनी पहिल्या दिवशीपासून परत आलेली पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना वितरितही केली आहे. मात्र, आता अचानक शिक्षणमंत्र्यांनी घोषणा करून जुनी पाठ्यपुस्तके परत न घेता ती विद्यार्थ्यांकडेच राहू द्यावी, जेणेकरून त्याचा वापर ते सेतू अभ्यासक्रमाकरिता करतील, असे निर्देश दिले. यामुळे शाळांचा गोंधळ उडाला आहे. आता शाळांना परत घेतलेली पुस्तके त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार आहे.
कोट
यापूर्वी शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार आतापर्यंत अनेक शाळांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक पाठ्यपुस्तके जमा झाली आहे. आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा न करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. त्यामुळे सर्व स्तरावर गोंधळ उडाला असून कुणाचा पायपोस कुठे आहे तेच कळत नाही.
राजेश सावरकर,
राज्य प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक समिती