गणेश वासनिक
अमरावती : ब्रिटिशकाळानंतर प्रथमच राज्यात वनजमिनीचा शोध घेण्यासाठी शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत बीटनिहाय वनक्षेत्राचे जीपीएसने मोजणी करण्यास प्रारंभ केला आहे. या माध्यमातून लवकरच वनक्षेत्राची आकडेवारी पुढे येणार आहे. वनविभागातील वनक्षेत्र हे पारंपरिक पद्धतीने म्हणजेच टीसीएमनंतर सिमेंट पोलद्वारे नियतक्षेत्राची सीमा आखली आहे. मात्र, जुने खोदलेले टीसीएम सध्या बुजलेले असून केवळ वनरक्षकांकडे असलेल्या बीट नकाशावरुन वनखंडाची ओळख होते. 100 वर्षांपासून वनखंडाच्या सीमा नष्ट झाल्याने वनविभागापुढे नवा पेच निर्माण झाला.
राज्याचे वनक्षेत्र कमी झाले की काय? याची चाचपणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत वनजमिनींची मोजणी सुरू केली आहे. ‘रेव्हेलो अॅप’ राज्याच्या सात हजार वनरक्षकांच्या मोबाईलमध्ये अपडेट केले आहे. त्यानुसार वनक्षेत्राची मोजणी संबंधित बीटचे वनरक्षक करीत आहे.
‘रेव्हेलो अॅप’ने मोजणीवनविभागाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने हा ‘रेव्हेलो अॅप’ तयार केला आहे. संपूर्ण राज्याचे नियंत्रण नागपूर वन भवनातून करण्यात येत आहे. हा अॅप वनरक्षकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केला असून डोंगर, दऱ्यांमध्ये इंटरनेट नसले तरी हा अॅप काम करतो. वनक्षेत्राची मोजणी कशी करावी, अॅप कसे सुरू करून वनक्षेत्रात फिरायचे, याबाबत प्रशिक्षण घेऊन वनाधिकारी ते वनरक्षकांना माहिती देण्यात आली आहे.
नकाशा जुळविण्याची कसरतवनरक्षकांकडे त्यांच्या बीटचा छापिल वनखंडनिहाय क्षेत्रनिहाय नकाशा असतो. या नकाशांना जोडून वनरक्षक बीटचे लोकेशन सांगतो. वनविभागात या नकाशांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने नवीन अॅपनुसार नकाशे तयार होणार आहे. मात्र, फिरताना चूक झाल्यास वनक्षेत्र कमी किंवा जास्त दिसण्याची भीती असल्याने वनरक्षक त्यांच्याकडील अॅपच्या लाल रंगाच्या लाईननुसार जुळवाजुळव करीत पायी चालत आहे. पण, काही दिवसांपूर्वी लाल रंगाची लाईन वनरक्षकांना दिसणे बंद झाली. ही बाब वरिष्ठांना लक्षात आले की, नकाशा दाखविला तर वनरक्षक तो सहज जुळवून वनक्षेत्र व्यवस्थित असल्याचे दाखविल म्हणून ही शक्कल लढविली आहे.
वनरक्षकांची अदृश्य चालप्रत्येक वनरक्षकांकडे साधारणत: 350 ते 1000 हेक्टर वनक्षेत्र सांभाळण्याकरिता दिले जाते. नवीन तंत्रज्ञानाने आता त्यांच्या बीटचे वनक्षेत्र जागेवर आहे किंवा नाही, हे तपासून घेण्यासाठी बीटच्या सीमा पायी फिरायच्या आहे. राज्यातील अर्ध्यापेक्षा वनक्षेत्राची मोजणी करण्यात आली. मात्र, आता मोबाईलमधून नकाशा तयार करण्यासाठी लाल रंगाची लाईन दिली होती. ती आता बंद केल्याने मोबाईल हातात घेऊन वनरक्षक बीटच्या प्रमुख सीमेवरून अदृश्यपणे फिरताना दिसत आहे. त्यामुळे बीटचा नकाशा व्यवस्थित तयार होईल किंवा नाही ही भीती वनरक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
नव्या प्रगत तंत्रज्ञानाने पहिल्यांदाच वनजमिनींची मोजणी केली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाकडे वनजमिनींची प्रत्यक्षात आकडेवारी समोर येणार आहे. या उपक्रमाची जबाबदारी वन अधिकारी ते वनरक्षकांवर सोपविली आहे.सुधीर मुनगंटीवार,अर्थ व वने मंत्री, महाराष्ट्र