बडनेरातील विवाहित तरुणाबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार, अँटिजेन चाचणी अहवालावर प्रश्नचिन्ह
बड़नेरा : छातीत दुखत असल्यामुळे उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना एका तरुणाचा वाटेत मृत्यू झाला. रुग्णालयात आणल्यानंतर कोरोनासंबंधी अँटिजेन टेस्ट करण्यात आली. अवघ्या एक तासाच्या फरकात दोन टेस्ट पॉझिटिव्ह, तर तिसरी निगेटिव्ह आली. सर्वांना बुचकळ्यात
टाकणाऱ्या या घटनेने अँटिजेन चाचणी अहवालावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. बडनेरातील पाचबंगला परिसरात राहणारा ३२ वर्षीय तरुण २६ एप्रिल रोजी छातीत दुखत असल्याने एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. तेथून या तरुण रुग्णाला इर्विन रुग्णालयात हलविले. तो दगावल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नातेवाइकांच्या उपस्थितीत मृताची कोरोना चाचणी करण्यात आली. पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली. आमचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही, पुन्हा एकदा चाचणी करा ,असा आग्रह नातेवाइकांनी धरल्यानंतर दुसऱ्यांदा पंधरा मिनिटांच्या फरकाने केलेली चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली. तरीही नातेवाईक आपला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याच्या मुद्द्यावर ठाम होते. यामुळे एक तासाच्या अंतराने तिसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली. ती मात्र निगेटिव्ह आली. आता आश्चर्याचा धक्का डॉक्टरांकरिता होता. मृतदेहाचे अंत्यसंस्कार आम्ही करतो, असे म्हणून नातेवाइकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातून मृतदेह मिळविला.
मृत तरुण विवाहित होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे. तो मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकत होता. एका तासात ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’च्या या प्रवासाने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
-------------------
मृत तरुण माझा जवळचा मित्र होता. मृत्यूनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वांसमक्ष कोरोना चाचणी करण्यात आली. मी यावेळी हजर होतो. यामुळे चाचण्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
- उज्ज्वल मेश्राम, बड़नेरा.