लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू नटवा येथील ३५ वर्षीय युवक बेंबळा नदीच्या पात्रात बुधवारी वाहून गेला. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. बेंबळा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मासे पकडण्यासाठी शेलू नटवा येथील नितीन गणपतराव शेंडे (३५) हा युवक बेंबळा नदीवर गेला होता. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास मासोळ्या पकडत असताना नदीच्या जोरदार प्रवाहात तो वाहत गेला.
ही घटना कळताच तहसीलदार पीयूष चिवंडे, नायब तहसीलदार चेतन मोरे, ठाणेदार उदय सोयस्कर व पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक ओंकार सोळंके, चंद्रकांत कोष्टी, विनोद कुरळकर, प्रशांत बेलोकार, विवेक ठाकरे, सचिन मसांगे, सदाशिव देवकाते या पोलीस कर्मचाऱ्यांनी सायंकाळी अंधार पडण्यापर्यंत गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवले. पण, त्याचा शोध लागला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार असल्याचे ठाणेदारांनी सांगितले.