झाडाला फुले, शेंगा आल्याच नाहीत, शेंदूरजना खुर्द येथील शेतकऱ्यांची तक्रार
तिवसा : पाच एकर सोयाबीन पेरलेले शेत हिरवेगार झाले. झाडांची उंची देखील वाढली. परंतु, या झाडांना अद्यापही फुले व शेंगा न आल्या नाहीत, अशी व्यथा व्यक्त करीत बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेंदूरजना खुर्द येथील शेतकरी अशोक माहोरे यांनी तिवसा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली.
शेंदूरजना खुर्द येथील अशोक माहोरे यांनी शेत सर्व्हे नंबर १५९ मधील पाच एकर शेतात ओसवाल कंपनीचे 93-05 हे सोयाबीन बियाणे पेरले. प्रतिबॅग ३७०० रुपयांप्रमाणे पाच बॅग बियाण्याकरिता १८ हजार ५०० रुपये त्यांनी खर्च केले. सोयाबीनची उगवण क्षमता चांगली असल्याचे त्यांना कृषिनिविष्ठा विक्रेत्याकडून सांगण्यात आले. पिकाला सर्व प्रकारची खते रोगनाशक फवारणी तसेच मशागत केली. परंतु सोयाबीन पिकाला आतापर्यंत फुले व शेंगा आल्याच नाहीत. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली. बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर तसेच वितरण करणाऱ्या कृषिसेवा केंद्रावर कारवाई आणि नुकसानभरपाईची मागणी त्यांच्यासह परिसरातील आणखी काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------------------------
शेतात जाऊन पाहणी केली. फूल व शेंगांची नेमकी कशामुळे झालेली नाही, हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांना बोलावून त्यांच्याकडून पाहणी करण्यात येईन. त्यानंतर याबाबत कळू शकेल.
- अनिल कांबळे, तालुका कृषी अधिकारी