लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाट पर्यटनाला आलेल्या अमरावती येथील पर्यटकांच्या पुढ्यात चिखलदऱ्यातील मोझरी पॉईंट येथे रविवारी दुपारी ३ वाजता वीज कोसळली. यात पाच पर्यटक जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेने पर्यटनस्थळावर एकच खळबळ उडाली.चिखलदरा येथे प्रत्येक वीकेंडला हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. अमरावती येथील साबळे परिवारासह त्यांचे नातेवाईक पर्यटन सफारीला आले होते. मोझरी पॉईंट परिसरात अचानक वीज कोसळली. तेथे पॉईंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा धक्का लागला. त्यामध्ये किशोर मोतीराम साबळे (५५), वैशाली किशोर साबळे (२६), आदित्य राजेश जवंजाळ (१३) यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. अमरावती येथील सागर ठाकूर (३०), ब्राह्मणे (५०) हे दोघेदेखील विजेच्या कडकडाटासह झालेल्या आवाजाने कमालीचे भेदरले होते. त्यांच्यावरही ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. आवाजाने इतर सहकारीही भेदरल्याची माहिती डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यासंदर्भात चिखलदरा पोलीस ठाण्यात कुठल्याच प्रकारची नोंद नव्हती.
पर्यटन स्थळावर मुसळधार पाऊस, धुकेगत तीन दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावून शनिवारी रात्रीसुद्धा धो-धो कोसळला. रविवारी पावसासह दाट धुके होते.
चिखलदरा येथील मोझरी पॉईंटवर वीज कोसळून काही पर्यटक जखमी झाल्याचे समजले होते. त्यासंदर्भात पोलिसात कुठल्याच प्रकारची माहिती आलेली नाही. माहिती घेणे सुरू आहे. - राहुल वाढवे, ठाणेदार, चिखलदरा
मोझरी पॉईंटवर वीज कोसळल्याने बाजूला उभ्या असलेल्या तीन पर्यटकांना इजा पोहोचली. त्यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. - संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा