जिल्हा रुग्णालयाचे परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वरूड येथे ग्रामीण रुग्णालय व अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण होईल. कोविन ॲपवर नोंदणीकृत दोनशे तरुण गटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर लसीच्या पुरवठ्यानुसार लसीकरणाचा विस्तार करण्यात येईल, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.
राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय नुकताच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून, अमरावती येथे पाच केंद्रांची निवड करण्यात आली आहे. शासनाकडे सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपलब्ध असून, पाठपुराव्याने जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला सूचना केली आहे.
-----------------
कोविन ॲपवर नोंदणी करा
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल ॲपवर नोंदणी करावी. कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.