इंदल चव्हाण-
अमरावती : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत सध्या पाच संचालक अपात्र असताना ते पूर्णत: निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊन धोरणात्मक निर्णय घेत आहे. ही बाब अतिशय गंभीर असताना याकडे सहकार विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. बुधवारी होऊ घातलेल्या संचालकांच्या बैठकीत हा मुद्दा तापण्याचे संकेत आहे.
तीन संचालकांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा सहकारी सोसायटीकडे राजीनामा दिले आहे. तर एक संचालक ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाले आहेत. एका संचालकाने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जच दाखल केलाच नाही. त्यामुळे हे संचालकही बाजार समितीत अपात्र ठरले आहे.
अमरावती बाजार समितीत १८ संचालक आहेत. बाजार समितीच्या कायद्यानुसार बाजार समितीत उमेदवारी अबाधित ठेवण्याकरिता ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थेत सदस्यत्व असणे बंधनकारक आहे. अन्यथा ग्रामपंचायत किंवा सेवा सहकारी संस्थेत सदस्यत्व नसल्यास बाजार समितीवर संचालकपदी सदर व्यक्ती नियमानुसार अपात्र ठरते. असे असताना स्थानिक कृषिउन्पन्न बाजार समितीत पाच संचालक अपात्र असताना ते धोरणात्मक निर्णय घेत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
सद्यस्थितीत जिल्हा बँकेची निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या बँकेवर सदस्यदत्व मिळविण्याकरिता सेवा सहकारी संस्थेतून समितीवर कार्यरत असलेल्या एकूण तीन संचालकांनी सेवा सहकारी संस्थेचे राजीनामे दिलेले आहेत. तरीसुद्धा हे पाचही संचालक समितीवर नियमबाह्य कार्यरत असून समिती संचालक मंडळाच्या सभेत धोरणात्मक निर्णय घेत आहे. याबाबत आतातरी सहकार विभाग लक्ष देईल काय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बॉक्स
डीडीआरकडे तक्रार
बाजार समितीत संचालक पदावर असलेल्या एकाचा ग्रामपंचायत निवडणुकीत परावभव झाल्याने त्यांचे संचालकपद रद्द व्हावे, यासाठी सेवा सहकारी सोसायटीतील विरोधी सदस्यांनी डीडीआर संदीप जाधव यांच्याकडे तक्रारदेखील दिलेली आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
कोट
सभापती, उपसभापती मिळून १८ संचालकांचे मंडळ आहे. संचालकांची मासिक सभा बुधवार, १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. संचालकांच्या पात्र, अपात्रतेची व्याख्या मी सभापती म्हणून करून शकत नाही.
- अशोक दहीकर, सभापती, कृषिउत्पन्न बाजार समिती