ग्रामस्थ भयभीत : बडनेरा, कारंजा, नेर, चांदूररेल्वे येथून बोलावले बंबनांदगाव खंडेश्वर, मंगरुळ चव्हाळास : तालुक्यातील कणी मिर्झापूर येथे शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आग लागून पाच घरे व सात गुरांचे गोठे भस्मसात झाले. या आगीच्या तांडवाने गावकरी भयभीत झाले होते. काही अंतरावरील साहित्य हलविणे शक्य होत नव्हते. गावाच्या पश्चिमेकडून शेताकडील घरांना आग लागली. हवेचा झोक गावाच्या दिशेने सुरू असल्याने या आगीचे रौद्ररूप संपूर्ण गावातच पसरते की काय? या भीतीने गावकरी भयभीत झाले होते. या आगीत मीरा दिवाकर दांगे, ज्ञानेश्वर भीमराव राऊत, नितीन मानकर, कबीर नागोराव मारवाडी, गजानन इंझळकर यांच्या घरांची राखरांगोळी झाली. घरातून तूर, गहू, अंथरून-पांघरून सर्वच साहित्याचा कोळसा झाला. बबन सावदे, विश्वास भांगे, विष्णू सावदे, पांडुरंग अजमिरे, पुरुषोत्तम जयसिंगपुरे, प्रमोद अजमिरे यांचे गुरांचे गोठे आगीने कवेत घेतले. यातील जनावरांचा चारा व शेतीपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली. घरांलगतच असलेल्या विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर या आगीत भस्मसात झाला. गावकऱ्यांनी विहिरीवरून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी चांदूररेल्वे, नेर, बडनेरा, कारंजा येथील अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. घटनास्थळी तहसीलदार बी.व्ही.वाहुरवाघ, गटविकास अकिधारी सूरज गोहाड, पं.स. उपसभापती विजय आखरे, युवा सेनेचे प्रकाश मारोटकर घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहिस्तोवर आगीचे तांडव सुरूच होते. (तालुका प्रतिनिधी)
पाच घरे, सात गोठे भस्मसात
By admin | Published: April 30, 2017 12:13 AM