परतवाडा पोलिसांनी नोंदविले हमालांचे बयान
पान २ चे बॉटम स्टोरी
नरेंद्र जावरे
परतवाडा : बैतूल मार्गावरील रजत जिनिंग-प्रेसिंगमधून व्यापाऱ्यांच्या संगनमताने ग्रेडर व संबंधितांनी १ कोटी ७५ लक्ष रुपये किमतीच्या रुईगाठी चोरून विकल्याच्या प्रकरणात परतवाडा पोलिसांनी तक्रारकर्त्या हमालांचे बयान नोंदविले आहे. दुसरीकडे या गंभीर प्रकरणात तपासाची संथ गती पाहता, व्यापाऱ्यांना राजाश्रय मिळाल्याची ठाम शक्यता वर्तविली जात आहे. पणन महासंघाकडून होणाऱ्या चौकशीची गती मंदावल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या ‘एन्ट्री’ला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शासनाच्या पणन महासंघामार्फत कोट्यवधी रुपयांच्या कापसाची खरेदी करताना शासकीय ग्रेडर विनोद देशमुख, जिनिंग फॅक्टरीचा मालक व व्यापाऱ्यांनी संगनमताने जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीमधून मध्यरात्रीच्या सुमारास पाचशे रुईगाठी खासगी ट्रकमधून चोरी गेल्याची तक्रार तेथेच कार्यरत हमाल विजय काटे, गोविंद तरजुले, दुर्गेश भुरे आदींनी पणन महासंघाचे मुख्य व्यवस्थापक, जिल्हाधिकारी, पोलीस ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यत केली होती. त्यानुसार, रुईगाठी चोरी प्रकरणात तक्रारदार हमाल विजय काटे व अन्य दोघांचे बयान परतवाडा पोलिसांनी गुरुवारी नोंदविले. व्यापारी व शासकीय ग्रेडरच्या संगनमताने हा प्रकार झाल्याच्या पोलिसांपुढे सांगण्यात आले.
बॉक्स
कारवाईची घोडे अडले कुठे?
प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नागपूरहून अधिकारी परतवाड्यात डेरेदाखल झाले होते. संबंधित व्यापारी, ग्रेडर कारवाईच्या टप्प्यात असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र, प्रकरणाशी संबधित असलेल्यांनी राजकीय आश्रय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळेच चौकशीची गती मंदावली आहे. त्यामुळे सदर संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.
कोट
रुईगाठी प्रकरणात परतवाडा पोलिसांनी आम्हा तिन्ही तक्रारकर्त्यांचे बयान नोंदविले. मात्र, अद्याप प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. आम्ही तक्रारीवर ठाम आहोत.
विजय काटे
तक्रारकर्ता, परतवाडा